भारताच्या सौरभ चौधरीने कोरियात सुरु असलेल्या ISSF World Championship स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात ज्युनिअर गटात सौरभने २४५.५ अशा विक्रमी गुणांची कमाई करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे. याआधी इंडोनेशियात पार प़डलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही सौरभने सुवर्णपदकाची कमाई केली होती. एशियाडमध्ये सौरभसोबत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या अभिषेक वर्मानेही अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र पदकांच्या शर्यतीमध्ये तो मागे पडला.

१६ वर्षीय सौरभने पात्रता फेरीमध्ये ५८१ गुणांची कमाई करत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. यानंतर अंतिम फेरीत पहिल्या प्रयत्नापासूनच सौरभने आघाडी कायम राखत सुवर्णपदकाच्या दिशेने आगेकूच सुरु केली. सुवर्णपदकाच्या शर्यतीसाठी सौरभसमोर कोरियाच्या होजिन लिमचं आव्हान होतं. मात्र शेवटच्या प्रयत्नानंतर होजिनच्या खात्यात २४३.१ गुण जमा झाले, आणि सौरभने विश्वविक्रमी कामगिरी करत २४५.५ गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावे केलं. याचसोबत सौरभ चौधरीने आपल्या सहकाऱ्यांसह सांघिक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लागोपाठ दुसऱ्या मोठ्या स्पर्धेत मिळवलेल्या पदकामुळे सौरभ चौधरीकडून भारताच्या आशा वाढलेल्या आहेत.