आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या विश्वचषक (रायफल/ पिस्तूल) स्पध्रेतील महिला १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताची महिला नेमबाजपटू हिना सिधूची अंतिम फेरी यावेळी फक्त दोन गुणांनी हुकली. हिनाने पिछाडी भरून काढताना जोरदार पुनरागमन करत ३८२ गुणांची कमाई केली, पण अंतिम फेरीत पोहोचण्यात तिला अपयश आले.

हीनाने ९३, ९६, ९७ आणि ९६ अशा गुणांची कमाई केली. मात्र तिला १०३ खेळाडूंमध्ये १८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. याच गटात यशस्विनी सिंग देस्वालने ३८१ आणि हरविन स्राओने ३७३ गुण कमावले. या गटात ग्रीसच्या अ‍ॅना कोराकॅकीने २४१.२ गुणांसह सुवर्ण, युक्रेनच्या ओलेना कोस्टेव्हिचने २३८.३ गुणांसह रौप्य आणि चीनच्या लीन युएमेईने २१७.५ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

महिलांच्या तुलनेत भारतीय पुरुष नेमबाजांची कामगिरी फारच सुमार झाली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात ऑलिम्पिकपटू चैन सिंगला (११६३ गुण) ४४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर सत्येंद्र सिंग (११६१) आणि संजीव राजपूत (११४८) यांना अनुक्रमे ५७ व ६९ वे स्थान मिळाले. या कामगिरीमुळे भारताची पदकपाटी अद्याप कोरीच आहे.