जितू राय आणि मेहुली घोष यांना कांस्यपदक

भारताच्या शहझार रिझवीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासह विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली. मेक्सिकोत सुरू असलेल्या या स्पर्धेत जितू राय व मेहुली घोष या भारतीय खेळाडूंनी कांस्यपदकाची कमाई केली.

रिझवीने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ख्रिस्तियन रिट्झवर मात करताना २४२.३ गुणांचा विश्वविक्रम नोंदवला. जर्मनीच्या रिट्झने २३९.७ गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर जितूने २१९ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. भारताच्या ओमप्रकाशने चौथा क्रमांक मिळवताना १९८.४ गुणांची नोंद केली.

महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये मेहुलीने २२८.४ गुण नोंदवत कांस्यपदक मिळवले. तिची सहकारी अंजुम मुदगिलला चौथा क्रमांक मिळाला. तिने २०८.६ गुण नोंदवले. अपूर्वी चंडिला हिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने १४४.१ गुण मिळवले.

रिझवीने पुरुषांच्या प्राथमिक फेरीत द्वितीय स्थान मिळवताना ५७९ गुणांची नोंद केली, तर रिट्झने ५८८ गुणांसह अव्वल स्थान मिळवले होते. राय व ओमप्रकाश यांनी अनुक्रमे ५७८ व ५७६ गुणांची कमाई केली. अंतिम फेरीत रिझवीने शानदार कौशल्य दाखवले. महिलांच्या अंतिम फेरीत मेहुली व अंजुम यांच्यात पदकासाठी चिवट झुंज पाहायला मिळाली, मात्र मेहुलीने अंजुमला मागे टाकले. रुमानियाच्या लॉरा जॉर्जेटाने सुवर्णपदक तर चीनच्या होंग झुईने रुपेरी कामगिरी केली.

रिझवीची ही पहिलीच वरिष्ठ विश्वचषक स्पर्धा असतानाही त्याने कोणतेही दडपण न घेता विश्वविक्रमासह सोनेरी भरारी घेतली आहे, याचा मला अभिमान वाटत आहे. मेहुलीचीदेखील ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा असताना तिने आत्मविश्वासाने कौशल्य दाखवत कांस्यपदक मिळवले. ही खूप महत्त्वाची कामगिरी आहे. यंदा अनेक महत्त्वाच्या स्पर्धा असल्यामुळे त्यांचे हे यश प्रेरणादायी आहे.

राणिंदर सिंग, भारतीय रायफल असोसिएशनचे अध्यक्ष