इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशन विश्वचषक स्पर्धेत भारताने जोरदार सुरुवात केली आहे. भारताच्या जितू राय आणि हिना सिद्धूने १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. दिल्लीमधील कर्णी सिंह शुटिंग रेंजवर सुरु असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत २५ संघांनी सहभाग घेतला आहे. भारत पहिल्यांदाच इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशन विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करत आहे.

अंतिम सामन्यात जितू राय आणि हिना सिद्धूची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. भारतीय जोडी या सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर कामगिरी उंचावत जितू आणि हिनाने सामन्यात पुनरागमन केले आणि आघाडी मिळवली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत त्यांनी फ्रान्स आणि चीनचा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या जितू रायचे हे पहिलेच विश्व विजेतेपद आहे, तर हिनाने दुसऱ्यांचा विश्व विजेतेपदावर नाव कोरले आहे. याआधी २०१३ मध्ये महिलांसाठीच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात हिनाने बाजी मारली होती.

जितू आणि सिंधू जोडीने ४८३.४ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत फ्रान्सला रौप्य आणि चीनला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. याआधी पात्रता फेरीतदेखील भारतीय जोडीने अव्वल स्थान मिळवले होते. ‘मायदेशात, तुमच्या लोकांसमोर विजय मिळवणे अतिशय आनंददायी असते. मात्र मायदेशात खेळताना दडपणाचाही सामना करावा लागतो,’ अशी प्रतिक्रिया सिद्धूने विजयानंतर व्यक्त केली. ‘आमच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अंतिम फेरीत खेळताना अनेकांच्या नजरा जितू आणि माझ्यावर होत्या. त्यामुळे दोघांवरही दबाव होता,’ असे सिद्धूने पदक वितरण सोहळ्यानंतर बोलताना म्हटले.