महाराष्ट्राची तरुण नेमबाजपटू राही सरनौबतने २०२० साली जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. म्यूनिच शहरात सुरु असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत राहीने २५ मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. राहीसोबत भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीनेही पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

याआधी राही सरनौबतने आपल्या दुखापतीवर मात करत आशियाई खेळांमधून पुनरागमन केलं होतं. या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवलं होतं. म्यूनिच येथील स्पर्धेत राहीसोबत मनू भाकेरचाही समावेश होता. अंतिम फेरीत मनूने राहीच्या तुलनेत चांगली सुरुवात करत आघाडीही घेतली होती, मात्र सातव्या फेरीत तिच्या बंदुकीमध्ये बिघाड झाला आणि मनू पिछाडीवर पडली. मात्र राहीने आपल्या कामगिरीत सातत्य कायम राखत सुवर्णपदकावर मोहर उमटवली.

भारतीय संघ या स्पर्धेत, ३ सुवर्ण पदकांसह आघाडीवर असून चीन एक सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.