|| तुषार वैती

नेमबाजी म्हणजे भारताचे ऑलिम्पिकमध्ये वाजणारे खणखणीत नाणे. भारताने आतापर्यंत सर्वाधिक ऑलिम्पिक पदके नेमबाजीतच पटकावली आहेत, हे विसरून चालणार नाही. टोक्यो ऑलिम्पिकआधी मायदेशातच झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने १५ सुवर्णपदकांसह एकूण ३० पदके मिळवत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारतीय नेमबाज ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करण्यासाठी सज्ज आहेत, हे या यशाने दाखवून दिले. भारताने मिळवलेले हे यश सुखावह असले तरी आता नेमबाजांची खरी परीक्षा चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये लागणार आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदके मिळवली. हे खरे असले तरी करोना संसर्गामुळे अन्य देशांचा कमी सहभाग आणि ऑलिम्पिकमध्ये नसलेल्या सांघिक प्रकारांचा समावेश यामुळे यजमानांना हे शक्य झाले. भारताची १५ पैकी आठ सुवर्णपदके ही सांघिक प्रकारातील आहेत, जे ऑलिम्पिक स्पर्धा प्रकार नाहीत. काही स्पर्धामध्ये तगडे प्रतिस्पर्धी नसताना किंवा भारताचेच प्रतिस्पर्धी असताना यजमानांना सहजपणे सुवर्णपदकापर्यंत झेप घेता आली. काही देशांच्या संघांनी ऑलिम्पिक पात्रतेसाठी आपल्या क्रमवारीत सुधारणा होण्याकरिता या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक प्रकारात आठच संघ सहभागी झाले होते. त्यात भारताने दोन संघ उतरवले होते. त्यामुळे भारताला सुवर्ण आणि कांस्यपदक मिळवता आले. याच प्रकाराच्या पुरुषांच्या गटात फक्त भारत आणि अमेरिका हे दोनच संघ सहभागी झाले होते. हंगेरीने अखेरच्या क्षणी अंतिम फेरीतून माघार घेतली. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात फक्त दोन संघ खेळत होते तेही भारताचेच.

कमी देशांच्या सहभागावरून भारताची ही कामगिरी सर्वोत्तम मानावी का, अशी चर्चा सध्या रंगत आहे. पण करोनामुळे सर्व नेमबाजांचे संपूर्ण वर्ष वाया गेले. उपलब्ध साधनसामग्रीत सराव करता येणे शक्य असलेल्यांनीच आपल्या सरावावर लक्ष केंद्रित केले. अनेकांना कित्येक महिने सरावही करता आला नाही. काही जण नेमबाजी कशी करायचे हेदेखील विसरले होते. अशातच नवी दिल्लीत झालेल्या तीन सराव शिबिरांमध्ये कसून मेहनत घेत भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेत आपले कर्तृत्व पुन्हा एकदा दाखवून दिले. एका विश्वचषक स्पर्धेत पाच वैयक्तिक सुवर्णपदके मिळवणे, हीसुद्धा मोठी बाब म्हणावी लागेल.

१० मीटर पिस्तूल प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावणारा सौरभ चौधरी हा भारताचे ऑलिम्पिकमधील पदकाचे मुख्य आशास्थान. पात्रता फेरीत त्याने ५८७ गुण मिळवत आपल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील सर्वोत्तम कामगिरीशी बरोबरी साधली. १० मीटर एअर रायफल प्रकारात दिव्यांश सिंह पनवार याने ६२९.१ गुण मिळवले. गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत याच गुणांच्या आधारावर अंतिम फेरी सहज गाठली होती. अर्जुन बबुटा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नसला तरी त्याने ६३१.८ गुण मिळवले. अंजूम मुदगिल हिला सर्वोत्तम कामगिरी साकारता आली नसली तरी तिने ६२९.६ गुण मिळवले. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कडवी चुरस असतानाही संजीव राजपूतने ११७२ गुण मिळवले. रिओ ऑलिम्पिकमध्ये याच गुणाच्या आधारे त्याचे पदक नक्की झाले असते.

युवा नेमबाज चिंकी यादव हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत सुवर्णपदकासह ऑलिम्पिकसाठीचे स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे मनू भाकर आणि राही सरनोबत या भारताच्या अव्वल नेमबाज असतानाही शानदार कामगिरी करत तिने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. चिंकी पात्र ठरली असली तरी तिला ऑलिम्पिकचे तिकीट मिळण्याची शक्यता तशी धूसर आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यानेही आश्चर्यकारक कामगिरीची नोंद केली. पात्रता फेरीत वादळी आणि पावसाळी वातावरणात त्याला आपली कामगिरी उंचावता आली नाही. पण अंतिम फेरीत तीन वेळा विश्वविजेता ठरलेला आणि जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या हंगेरीच्या इस्तवान पेनी याला मात देत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले. या सुवर्णपदकासहित ऑलिम्पिकचे स्थान पटकावत आता ऐश्वर्यचा आत्मविश्वासही गगनाला भिडलेला आहे. अंजूम मुदगिलचे अपयश भारताला सतावत आहे.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारताच्या १५ जागा निश्चित झाल्या आहेत. काही दिवसांतच ऑलिम्पिकसाठी भारताचा नेमबाजी संघ जाहीर के ला जाईल. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना नेमबाजांना परदेशात जाऊन सराव करण्याची संधी मिळणार नाही. अशातच नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग नेमबाजी के ंद्रावर पुढील तीन महिने सराव करून ऑलिम्पिकसाठी सज्ज होण्याचे भारतीय नेमबाजांचे उद्दिष्ट असेल. पण नेमबाजांची खरी परीक्षा ऑलिम्पिकमध्ये लागणार आहे.

tushar.vaity@expressindia.com