जर्मनीत सुरु असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत उदयवीर आणि विजयवीर सिद्धु या जुळ्या भावांनी आपला सहकारी राजकंवर सिंह याच्यासोबत सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात उदयवीर आणि विजयवीर या भावांनी हे दैदिप्यमान यश मिळवलं आहे. मात्र या दोन्ही भावांनी मिळवलेल्या यशामागची कहाणी खरचं प्रेरणादायी आहे. विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत दोन्ही भावांकडे स्वतःची पिस्तुल नव्हती. यावेळी उदयवीर आणि विजयवीर यांनी आपला सहकारी अर्जुनसिंह चीमा याच्याकडून उधारीवर पिस्तुल घेत सुवर्णपदकावर नेम साधला आहे. उदयवीरने सांघिक प्रकारासमावेत २५ मी. पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाचीही कमाई केली. दोन्ही भाऊ सध्या चंदीगढ येथील सरकारी कॉलेजमध्ये शिकत आहेत.

“जर्मनीत आम्ही १७७४ गुणांची कमाई करत २४ वर्षांपासून युक्रेनच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे. अर्थातच हे सर्व सांघिक कामगिरीमुळे शक्य झालं आहे. आम्ही दोघं एकत्र सराव करतो, यावेळी मला काही गोष्टी अडतात तेव्हा उदयवीर मला मदत करतो कधी मी देखील त्याला मदत करतो. गेल्या वर्षाअखेरीस आमच्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे हे पदक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे.” विजयवीर पत्रकारांशी बोलत होता.

उदयवीरने २५ मी. पिस्तुल वैयक्तीत प्रकारात आपला भाऊ विजयवीरला चौथ्या स्थानावर ढकलत ५८५ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. आपल्या दोन्ही मुलांनी देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याचा मला अभिमान असल्याचं मत उदयवीर आणि विजयवीर यांची आई राणो सिद्धु यांनी व्यक्त केलं. “माझे पती गुरप्रीत सिंह यांनी २०१० साली दोन्ही मुलांसाठी नेमबाजीचा सराव घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोन्ही भाऊ हे भाड्याने आणलेल्या बंदुकीवर सराव करत होते. मात्र आपल्या मुलांना सरावासाठी हक्काची बंदूक असावी यासाठी गुरप्रीत यांनी १ लाख ३० हजाराचा खर्च करुन १० मी. पिस्तुल खरेदी केली. मात्र जर्मनीत विश्वचषकासाठी बंदुकीचा खर्च करणं आम्हाला शक्य नव्हतं. याचकारणासाठी जर्मनीत उदयवीरला त्याचे प्रशिक्षक राजवीर यांनी बंदुकीची सोय करुन दिली तर विजयवीर त्याचा सहकारी अर्जुनसिंहची पिस्तुल वापरत ही कामगिरी केली.” आज माझे पती जिवंत असते तर ते आपल्या दोन्ही मुलांची कामगिरी पाहून खूश झाले असते, मुलांच्या कामगिरीवर खूश झालेल्या राणो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.