इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक आणि कॅरेबियन बेटांवर तिरंगी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाने आपला तोच आवेश कायम राखत झिम्बाब्वे दौऱ्याचा श्रीगणेशाही विजयानिशी केला. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशा खेळाचे प्रदर्शन करीत भारताला सहा विकेट आणि ३१ चेंडू राखून आरामात विजय मिळवून दिला. धोनी, आर. अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये दुबळ्या झिम्बाब्वेशी सामना करणे भारताला जड गेले नाही. भारताने या विजयासह पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. १०८ चेंडूंत १३ चौकार आणि एक षटकारासह ११५ धावांची खेळी साकारत कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीमधील १५व्या शतकाची नोंद केली.
कॅरेबियन दौऱ्यावरील तिरंगी मालिकेतील पहिले दोन सामने भारताने गमावल्यानंतर आव्हान टिकवणे कठीण झाले होते. परंतु धोनीच्या अनुपस्थितीत कोहलीने कर्णधारपद भूषवत भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने दमदार शतकाची नोंद केली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतही आपल्या नेतृत्वाचा तोच बाणा भारताची सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर कोहलीने दाखवला. कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी अंबाती रायुडूसोबत १५९ धवांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रायुडूने आपले एकदिवसीय क्रिकेटमधील बहुप्रतिक्षित पदार्पण झोकात साजरे करताना ८३ चेंडूंत नाबाद ६३ धावांची जबाबदारीपूर्ण खेळी उभारली.
त्याआधी, सिकंदर रझाची संयमी ८२ धावांची खेळी आणि अखेरच्या षटकांमध्ये एल्टन शिगुम्बुराने केलेली ३४ चेंडूंत नाबाद ४३ धावांची फटकेबाजी या बळावर झिम्बाब्वेने ७ बाद २२८ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
भारताचा कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघाला प्रथम फलंदाजीची संधी दिली. हरारे स्पोर्ट्स क्लब झिम्बाब्वेने प्रारंभी अतिशय धिम्या गतीने फलंदाजी केली. परंतु शिगुम्बुराने धडाकेबाज खेळी साकारल्यामुळे त्यांना ही धावसंख्या रचता आली.
भारताकडून अमित मिश्रा सर्वात यशस्वी ठरला. त्याने ४३ धावांत ३ बळी घेतले, तर विनय कुमार, मोहम्मद शामी, जयदेव उनाडकट आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला. मिश्रा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ९ षटकांमध्ये ५७ धावा दिल्या.
पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सलामीवीर रझाने सहा चौकार आणि दोन षटकारांसह आपली खेळी साकारली, तर शिगुम्बुराने आपल्या खेळीमध्ये सहा चौकार आणि एक षटकाराची आतषबाजी केली.
सलामीवीर विसू सिबांडा आणि रझा यांनी खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ लागला. पहिल्या १० षटकांमध्ये या दोघांनी फक्त दोन चौकारांची नोंद केली होती. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारची अनुपस्थिती सुरुवातीच्या षटकांमध्ये जाणवली. २२व्या षटकात मिश्राने सिबांडाला पायचीत करून झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. भारताला पहिला बळी जरी उशिराने मिळाला तरी झिम्बाब्वेच्या धावफलकावर त्यावेळी फक्त ७२ धावा झळकत होत्या.
धावफलक
झिम्बाब्वे : वुसी सिबांडा पायचीत गो. मिश्रा ३४, सिकंदर रझा त्रिफळा गो. मिश्रा ८२, सीन विल्यम्स त्रिफळा गो. रैना १५, हॅमिल्टन मसाकाझा त्रिफळा गो. मिश्रा ११, ब्रेन्डन टेलर झे. रैना गो. उनाडकट १२, माल्कम वॉलर त्रिफळा गो. शामी २, एल्टन शिगुम्बुरा नाबाद ४३, टिनोटेंडा म्युटोमबोझी झे. धवन गो. विनय कुमार ८, प्रोस्पर उत्सेया नाबाद ८, अवांतर (बाइज-२, लेगबाइज-७, वाइड-४) १३, एकूण ५० षटकांत ७ बाद २२८
बाद क्रम : १-७२, २-१०५, ३-११९, ४-१६२, ५-१६६, ६-१७६
गोलंदाजी : विनय कुमार ९-१-५७-१, मोहम्मद शामी १०-१-४५-१, जयदेव उनाडकट १०-१-३९-१, रवींद्र जडेजा १०-३-३३-०, अमित मिश्रा १०-१-४३-३, सुरेश रैना १-०-२-१.
भारत : रोहित शर्मा झे. टेलर गो. शिगुम्बुरा २०, शिखर धवन झे. वॉलर गो. जाव्‍‌र्हिस १७, विराट कोहली झे. सिबांडा गो. उत्सेया ११५, अंबाती रायुडू नाबाद ६३, सुरेश रैना झे. रझा गो. उत्सेया ०, दिनेश कार्तिक नाबाद ८, अवांतर (लेगबाइज १, वाइड ५, नोबॉल १) ७, एकूण ४४.५ षटकांत ४ बाद २३०
बाद क्रम : १-२६, २-५७, ३-२१६, ४-२१६
गोलंदाजी : कायले जाव्‍‌र्हिस ८-०-४०-१, टेंडई छतारा ९-०-३०-०, एल्टन शिगुम्बुरा ५-०-३०-१, प्रोस्पर उत्सेया १०-०-३४-२, टिनोटेंडा म्युटोमबोझी ७.५-०-६५-०, सीन विल्यम्स ३-०-१८-०, हॅमिल्टन मसाकाझा २-०-१२-०.