भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ बनलेल्या युवा खेळाडू विराट कोहली याने वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विवियन रिचर्ड्स यांच्या जलद पाच हजार धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या दोघांनी पाच हजार धावा ११४व्या डावात पूर्ण केल्या. या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर आनंद झाल्याचे मत कोहलीने व्यक्त केले असून अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचे सांगायला तो विसरला नाही.
‘‘बंगळुरू येथील सामन्यादरम्यान मला या विक्रमाबद्दल सांगण्यात आले होते, पण खेळताना मी हे सारे विसरून गेलो. कारण खेळताना मी विक्रमाचा विचार करत नाही. मी स्वत:लाच सांगितले की, जर तू चांगली फलंदाजी केलीस, तर त्याबरोबर व्रिकमही होत जातील,’’ असे कोहलीने सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
सामनावीर कोहलीने या सामन्यात ८४ धावांची खेळी साकारताना रिचर्ड्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आणि रोहित शर्माबरोबर दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तो पुढे म्हणाला की, ‘‘रिचर्ड्स यांच्यासारख्या महान फलंदाजांच्या विक्रमाशी बरोबरी करणे हे सुखावह आहे. पण याचा अर्थ मी इथे थांबेन किंवा यावर मी संतुष्ट आहे, असा होत नाही. यापुढे अजून बराच पल्ला मला गाठायचा आहे.’’