News Flash

भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान महत्वाचे

९९२-९३ साली मुंबईच्या संघात आम्ही सारेच युवा होतो आणि नेतृत्व रवी शास्त्रीकडे होते.

अमोल मुझुमदार , मुंबईचा माजी कर्णधार

अमोल मुझुमदार , मुंबईचा माजी कर्णधार

पाचशेवा सामना खेळणे ही मुंबईसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यावरून हे कळून चुकते की, मुंबईने रणजीमध्ये किती वर्चस्व राखले असेल. मुंबईचे भारतीय क्रिकेटला असलेले योगदान किती आहे, हे या पाचशेव्या सामन्यावरून समजू शकते. माझ्या कारकीर्दीमध्ये मुंबई आठ वेळा विजेती ठरली. आतापर्यंतचे दोन मोसम मला आठवतात. १९९२-९३ साली मुंबईच्या संघात आम्ही सारेच युवा होतो आणि नेतृत्व रवी शास्त्रीकडे होते. आम्ही त्या मोसमात बलाढय़ बंगालविरुद्ध अंतिम फेरीत खेळताना विजय मिळवला होता. दुसरा मोसम म्हणजे २००६-०७. या वेळी मी कर्णधार होतो. माझ्या मते असा मोसम कधी होऊ शकतो, असे मला वाटत नाही. या मोसमात जो काही आमच्या मनात कोलाहल होता, तो कधीही झाला नव्हता.

मुंबईच्या खेळाडूंना खडूस म्हटले जाते, हे मला फार चांगले वाटते. मी ‘खडूस’ होतो, असे काही जण म्हणतात. मी मैदानात कुणाशीच बोलायचो नाही; पण संघाच्या हिताचा विचार नेहमीच मनात असायचा. या खडूसपणाबद्दलचे बरेच किस्से आहेत. संजय मांजरेकर कर्णधार असतानाचा एक किस्सा कायम स्मरणात आहे. मुंबईच्या खेळाडूंनी नेहमीच क्रिकेटसाठी वाहून घेतले होते. १९९६-९७ साली दिल्लीविरुद्ध आम्ही अंतिम फेरीत खेळत होतो. दिवस-रात्र सामना होता. हॉटेलमध्ये आम्ही रात्री १०.३० वाजता आलो. रात्री दोन वाजता हॉटेलमधील रूमचे दार ठोठावले गेले. पाहतो तर संजय उभा होता. संजयने रात्री एक वाजता संघाची बैठक बोलावली होती. तिथेच सामन्याबद्दलची रणनीती आखली गेली आणि दुसऱ्या दिवशी मैदानात रणनीतीवर अमंलबजावणी केली गेली. खडूसपणा काय असतो, याचे हे सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक. एखादी गोष्ट ठरवली तर ती त्या वेळी व्हायलाच हवी, हे मुंबईच्या खेळाडूंसाठी सर्वात महत्त्वाचे होते. माझ्याच बाबतीतला एक किस्सा सांगतो. २००६-०७मध्ये हैदराबादविरुद्धच्या रणजी स्पर्धेतील तिसरा सामना आम्ही पराभूत झालो होतो. मुंबईला पराभूत होण्याची सवय नाही. मुंबई कशी हरू शकते, हा प्रश्न सलत होता. तीन सामने गमावल्यावर आमच्या खात्यात एकही गुण नव्हता. मी माझ्यावरच रागावलो होतो. सामना संपल्यावर खेळाडूंशी हस्तांदोलन करताना मी त्यांच्या कर्णधाराला सांगितले, ‘‘आपण अंतिम फेरीत भेटू. मला माहिती नाही तुम्ही अंतिम फेरीत पोहोचाल की नाही, पण आम्ही नक्कीच अंतिम फेरीत पोहोचणार आहोत. त्यामुळे आता भेट अंतिम फेरीतच!’’ प्रवीण अमरेला हे समजले. तो मला बाजूला घेऊन गेला. त्याने मला समजावले; पण या मोसमाच्या अंतिम फेरीत आम्ही पोहोचलो, पण हैदराबाद पोहोचू शकली नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीचे जेतेपद पटकावले होते ते मुंबईनेच!

शब्दांकन : प्रशांत केणी  / प्रसाद लाड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 5:35 am

Web Title: it is a proud thing for mumbai to play 500th ranji game say amol muzumdar
Next Stories
1 ‘हेडमास्टर’ हा शिक्का प्रशिक्षकपदाच्या उत्तरार्धातील कारकीर्दीत बसला!
2 अखेरच्या सामन्यात भारताचा विजय, मालिका २-१ ने खिशात
3 Video: लाडक्या मुलीच्या गोलंदाजीवर गौतमची ‘गंभीर’ परीक्षा
Just Now!
X