पुरुष आणि महिला यांच्याबाबत असमानता आपल्या देशात अजूनही पाळली जात असल्यामुळे सानिया मिर्झासारखी खेळाडू होणे अवघड झाले आहे, अशा शब्दांत तिने विश्लेषण केले. संयुक्त राष्ट्र संघाने दक्षिण आशियाई देशांची सदिच्छा दूत म्हणून सानियाची मंगळवारी नियुक्ती केली. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात तिने आपली मते प्रामाणिकपणे मांडली.
‘‘टेनिसमध्ये जागतिक स्तरावर कारकीर्द घडविताना आपल्या देशातच मला खूप झगडावे लागले आहे. कारकीर्दीत अनेक वादंगांना मला सामोरे जावे लागले आहे. अनेक वेळा माझ्यावर कडाडून टीका झाली आहे. जर मी पुरुष खेळाडू असते तर अशा प्रसंगांना व टीकेला मला सामोरे जावे लागले नसते,’’ असे सानिया म्हणाली.
 महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय तसेच लिंगभेद आदी अपप्रवृतींविरुद्ध चळवळ उभारली जात आहे. त्यामध्ये सानियाचा सहभाग राहणार आहे. ती म्हणाली, ‘‘आपल्या देशातील अधिकाधिक मुलींनी क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवली पाहिजे. सांस्कृतिक बदल करण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने पुरुष व महिला यांना समान हक्क देण्याबाबत पुढाकार घेतला आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. केवळ शासनानेच नव्हे, तर समाजानेही त्याबाबत सकारात्मक बदल केले पाहिजेत.’’

स्त्री ही केवळ उपभोगाची गोष्ट नाही तर ती एक माता असते, एक पत्नी असते, एक बहीण असते हे लक्षात घेऊनच प्रत्येक पुरुषाने स्त्री जातीचा सन्मान केला पाहिजे. त्यांना आदराची वागणूक दिली पाहिजे.-सानिया मिर्झा