भारताच्या एकदिवसीय संघाचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीकडून श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुरलीधरन याला खूप आशा आहेत. पण असे असले तरी कोहलीचा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कस लागणार असल्याचे मुरलीधरनने म्हटले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या शिबीरासाठी मुरलीधरन गोलंदाजी सल्लागार म्हणून कोलकातामध्ये आहे. ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मुरलीधरनने नुकतेच भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलेल्या महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले. यासोबत कोहलीबद्दलही आपले मत व्यक्त केले.

 

विराट कोहलीकडून मला खूप अपेक्षा आहेत आणि त्यालाही आव्हानांना सामोरे जाण्यास खूप आवडते. इंग्लंडचा एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघ मजबूत व कसोटी संघापेक्षा खूप वेगळा आहे. इंग्लंडच्या संघाला गृहीत धरून अजिबात चालणार नाही. मैदानात कोहलीने नक्कीच धोनीचा सल्ला घेणे योग्य ठरेल. विराट कोहलीचा या मालिकेत कस लागणार आहे, असे मुरलीधरन म्हणाला.

वाचा: धोनीसारखे यश मोजक्याच कर्णधारांना- युवराज सिंग

माझ्या आजवरच्या क्रिकेट कारकिर्दीत पाहिलेला महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून धोनीच्या नेतृत्त्वात मी तीन वर्षे खेळलो. धोनीमध्ये मी केव्हाच गर्व पाहिला नाही. तो खूप शांत आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंचे सल्ले घेण्यास अजिबात टाळाटाळ किंवा कमी लेखून घेत नाही. माझ्या आणि माईक हसीच्या सल्ल्यांची तो नेहमी दखल घ्यायचा. धोनी खूप मोठा खेळाडू आहे, असेही मुरलीधरन म्हणाला.

वाचा: अश्विन यंदाच्या वर्षात धोनी आणि विराटलाही मागे टाकणार

भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. येत्या १५ जानेवारी रोजी पुण्यात इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. धोनीने कर्णधारपद सोडले असले तरी तो संघाचा भाग असणार आहे. याशिवाय संघात युवराज सिंग याचेही पुनरागमन झाले आहे.