कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. दहशतवादाच्या सावटाखाली श्रीलंका क्रिकेट मंडळाने पाकिस्तान दौऱ्याचा निर्धार केला. त्यानुसार मंगळवारी श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला पोहोचला आणि तब्बल १० वर्षानंतर पाकिस्तानात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना रंगला. पाकिस्तानात तब्बल १० वर्षानंतर श्रीलंकेविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात आला. त्यानंतर दहशतवादावर खेळानेच मात करणं महत्त्वाचं आहे, असे मत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी व्यक्त केले.

“श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला त्यांच्या खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची होती. त्याच्याविषयी हयगय करून चालणार नव्हते. आम्हीही त्या गोष्टीला प्राधान्य दिले आणि खेळाडूंच्या सुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार याची खात्री पटल्यावरच त्यांनी संघाला पाकिस्तान दौऱ्याची परवानगी दिली. खेळ हा असा प्रकार आहे, जो साऱ्यावर तोडगा काढू शकतो. कारण खेळानेच दहशतवादावर मात केली जाऊ शकते”, असा विश्वास मणी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तर कराचीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर पाकिस्तानने ६७ धावांनी मात केली. बाबर आझमच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ३०५ धावांचा पल्ला गाठला. बाबरने संयमी खेळी करत १०५ चेंडूत ११५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यानंतर उस्मान शिनवारीने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.