शेवटचा बळी बाद होईपर्यंत किंवा अखेरची धाव काढेपर्यंत सामना संपत नसतो. त्यामुळे सुरुवातीला बळी गमावल्यानंतरही अखेपर्यंत लढा द्यावा लागतो. वैयक्तिक कामगिरीपेक्षाही संघासाठी विजय मिळवून देणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे कठीण परिस्थितीतून बोध घेत सामने जिंकून देणे महत्त्वाचे असते, असा मौलिक सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी दिला आहे.

माहूल येथे आयोजित १४ वर्षांखालील एजिस फेडरल इन्श्युरन्स चषक क्रिकेट स्पर्धेत वेंगसरकर बोलत होते. ते म्हणाले की, ‘‘आपल्या वयोगटापेक्षा म्हणजेच १६ किंवा १९ वर्षांखालील गटात खेळलात तर तुम्ही अधिक प्रगती करू शकाल.’’ १२ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत गौड सारस्वत क्रिकेट क्लबने एजिस फेडरल वेंगसरकर अकादमीवर १६६ धावांनी विजय मिळवत जेतेपद पटकावले.

प्रथम फलंदाजी करताना गौड सारस्वत संघाने ४० षटकांत ४ बाद २९८ धावा केल्या. सलामीवीर आर्यन चव्हाणने १६ चौकार आणि १ षटकारासह १५८ धावा फटकावल्या. हे आव्हान गाठताना वेंगसरकर अकादमीला ९ बाद १३२ धावाच करता आल्या. ऑफस्पिनर मान भानुशालीने चार बळी मिळवत विजयात महत्त्वाचे योगदान दिले. आर्यन स्पर्धेतील तसेच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.