इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताला २-१ ने पराभव स्विकारावा लागला. या मालिकेत महेंद्रसिंह धोनीने केलेला संथ खेळ चांगलाच चर्चेत आला होता. दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय संघ ३२३ धावांचा पाठलाग करत असताना धोनीने मोक्याच्या क्षणी संथ खेळ करत ५९ चेंडूत अवघ्या ३७ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यातही धोनीला फारशी चमक दाखवता आली नाही. ६६ चेंडू खर्ची घालत धोनीने अवघ्या ४२ धावा काढल्या. तिसरा सामना संपल्यानंतर धोनी पंचांच्या हातातून चेंडू घेत असतानाची दृष्य सर्वत्र पसरली आणि यानंतर धोनी क्रिकेटला रामराम ठोकतो की काय अशा चर्चा रंगू लागल्या होता. यादरम्यान विराट कोहली, रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. आता दस्तुरखुद्द सचिन तेंडलुकरही महेंद्रसिंह धोनीच्या मदतीला धावून आला आहे.

“निवृत्ती कधी घ्यायची हा धोनीचा प्रश्न आहे, आणि हा निर्णय आपण सर्वांनी त्याच्यावरच सोपवायला हवा. मैदानात प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळल्यानंतर आपल्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत याची प्रत्येक खेळाडूला जाण असते. याचसोबत आपण आणखी किती वर्ष खेळू शकतो हे देखील खेळाडू पुरता ओळखून असतो. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय हा महेंद्रसिंह धोनीने त्याला योग्य वाटेल त्या वेळी घेणं अधिक योग्य ठरेल.” Mumbai Mirror वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सचिनने धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर आपली बाजू मांडली.

धोनी अनुभवी खेळाडू आहे, इतरांपेक्षा तो स्वतःचा खेळ काळानुरुप कसा आहे हे जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्याचा एक माजी सहकारी या नात्याने मला पूर्ण विश्वास आहे की धोनी योग्य वेळ येताच निवृत्तीचा निर्णय जाहीर करेल. सचिनने धोनीच्या निवृत्तीवरुन होत असलेल्या चर्चांवर आपलं मत व्यक्त केलं. धोनीप्रमाणेच सचिनच्या कारकिर्दीतही त्याच्यावर निवृत्तीचा दबाव वाढलेला होता, अनेक टीकाकार, माजी खेळाडू यांनी सचिनला क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला सांगितली होती. मात्र २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानात वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळत सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता सचिननेच धोनीला आपला पाठींबा दर्शवल्यानंतर धोनीच्या निवृत्तीबद्दल सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.