२ एप्रिल २०११ हा दिवस कोणताही भारतीय क्रिकेटप्रेमी विसरु शकणार नाही. २८ वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करत विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात, श्रीलंकेकडून महेला जयवर्धनने शतकी खेळी करत आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. प्रत्युत्तरादाखल भारताने विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना लवकर गमावलं. यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरने भारतीय संघाचा डाव सावरला, मात्र कोहली माघारी परतल्यानंतर युवराज सिंह ऐवजी स्वतः कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला आणि त्यानंतर मैदानात त्याने केलेली खेळी आपण सर्व जाणतोच.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात युवराजऐवजी धोनीला बढती देण्याचा हा निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकीत करुन गेला होता. मात्र हा निर्णय सचिनच्या सल्ल्याने घेण्यात आल्याचं सेहवागने स्पष्ट केलं आहे. क्रिकेट मुलाखतकार विक्रम साठे याच्या ‘What the Duck’ या कार्यक्रमात बोलत असताना विरेंद्र सेहवागने हा खुलासा केला आहे. या कार्यक्रमात सेहवागसोबत सचिननेही हजेरी लावली होती.