ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात पार पडल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन आयसीसीने पुढे ढकललं आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर बीसीसीआयसाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीचा रस्ता मोकळा झाला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारीला सुरुवात केली होती, फक्त अधिकृत घोषणा करण्यासाठी आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेणं बीसीसीआयसाठी बंधनकारक होतं. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

“पुढचा आठवडा किंवा जास्तीत जास्त १० दिवसांमध्ये गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होईल. या बैठकीत आयपीएलच्या आयोजनाबद्दल अंतिम निर्णय होऊन त्याबद्दल घोषणा केली जाईल. सध्यातरी आयपीएलचं आयोजन हे याआधी ठरल्याप्रमाणेच म्हणजेच ६० सामन्यांसह होणार आहे. यंदाची स्पर्धा युएईमध्ये भरवली जाण्याची शक्यता जास्त आहे.” पटेल यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली. आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत घोषणा केल्यानंतर संघमालकांनी आपल्या खेळाडूंना युएईमध्ये नेण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवली जाणार असल्यामुळे आयोजनात फारशी समस्या येणार नाही असंही पटेल म्हणाले.

आयपीएलमध्ये सहभागी होणारे परदेशी खेळाडू हे त्यांच्या देशातून थेट युएईमध्ये दाखल होतील. तर सरावाच्या दृष्टीकोनातून प्रत्येक संघमालक स्पर्धेच्या किमान एक महिनाआधी खेळाडूंना युएईमध्ये नेण्याच्या प्रयत्नात आहेत. “खेळाडूंना किमान ३ ते ४ आठवडे सरावाची गरज आहे. बीसीसीआयने आयपीएलबद्दल अधिकृत घोषणा केली की लगेचच आम्ही सर्व तयारीला लागणार आहोत. युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी आम्ही तयार आहोत,” अशी प्रतिक्रीया एका संघमालकाने बोलताना दिली. बीसीसीायमधील सूत्रांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल घोषणा केल्यानंतर, सर्वात आधी बीसीसीआय भारत सरकारकडे परवानगी मागेल. मात्र तोपर्यंत देशातली परिस्थिती सुधारलेली नसेल तर यंदाची स्पर्धा ही युएईमध्ये भरवण्यात येईल. २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.