स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पाडाव करत इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्याच नदालने जोकोविचला ७-५, १-६, ६-३ असे हरवले. दोघे खेळाडू टेनिसविश्वात कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांच्यात होणारी लढत ही चाहत्यांसाठी नेहमीच एक पर्वणी असते. हा सामनाही असाच रंगला. तब्बल २ तास ४९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात नदाल वरचढ ठरला.

एक नव्हे, दोन नव्हे तर सहाव्यांदा या दोघांमध्ये इटालियन ओपनचा अंतिम सामना खेळला गेला. नदालने या स्पर्धेची १२व्यांदा वेळी अंतिम फेरी गाठली आणि त्याने १०व्यांदा जेतेपदावर नाव कोरले. या विजयासोबत नदालने जोकोविचच्या ३६ एटीपी मास्टर्स १००० विजेतेपदाशी बरोबरी साधली.

 

 

 

पहिल्या सेटमध्ये दोघांनी कडवी झुंज दिली, मात्र नदालने आक्रमक खेळ करत हा सेट आपल्या नावावर केला. जोकोविचने पुनरागमन करत दुसरा सेट मोठ्या फरकाने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये आपला सर्व अनुभव पणाला लावत नदालने जोकोविचला पराभूत केले.
जोकोविचने या सामन्यात पाच एस देत चार चुका केल्या, तर नदालने तीन एस खेळत केवळ एक चूक केली.