सलग तिसरे ‘युरो’ जेतेपद पटकावण्याचे स्वप्न धुळीस; चिलीनी व पेल्लेचे निर्णायक गोल; उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीचे आव्हान

युरो चषक फुटबॉल स्पध्रेत सलग तिसरे जेतेपद पटकावून इतिहासात नोंद करण्यासाठी उत्सुक असलेल्या स्पेनचा अश्वमेध सोमवारी इटलीने उपउपांत्यपूर्व फेरीत रोखला. जिऑर्जिओ चिलीनी व ग्रॅझिअ‍ॅनो पेल्ले यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर इटलीने २-० असा सोपा विजय मिळवत अंतिम आठ संघांमध्ये धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर विश्वविजेत्या जर्मनीचे आव्हान आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमणावर भर देत इटलीने सलग युरो चषक जिंकणाऱ्या स्पेनवर  (२००८ व २०१२ साली) दडपण निर्माण केले. ९व्या व ११व्या मिनिटाला स्पेनचा गोलरक्षक डे गियाने चपळाईने इटलीचे गोल करण्याचे प्रयत्न अपयशी ठरवले. मात्र, इटलीने आक्रमण सुरूच ठेवले. ३३व्या मिनिटाला इमॅन्युएल गिआचेरीनीच्या पासवर चिलीनीने अगदी सहजपणे गोल करून इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४४व्या मिनिटाला डे गियाने पुन्हा इटलीसमोर अभेद्य भिंत उभी करून मध्यंतराला त्यांना १-० अशा आघाडीवरच समाधान मानण्यास भाग पाडले.

दुसऱ्या सत्रात स्पेनने पहिल्याच मिनिटाला मॅन्युएल दुरानला बदली खेळाडू म्हणून अ‍ॅडुरीझ झुबेल्डीयाला पाचारण केले. पण, त्याचा इटलीवर फार फरक पडला नाही. आक्रमणाची धार बोथट होऊ न देता इटलीने सामन्यावरील पकड मजबूत केली. आक्रमणाबरोबर बचावातही शिस्तबद्धता आणताना इटलीने स्पेनला जखडून ठेवले. दोन मिनिटांच्या भरपाई वेळेत  पेल्लेने अप्रतिम व्हॉलीद्वारे गोल करताना इटलीचा २-० असा विजय निश्चित केला.

हंगेरीला नमवून बेल्जियम उपांत्यपूर्व फेरीत

ईडन हॅझार्डने युरो चषक फुटबॉल स्पध्रेत पहिल्या गोलची नोंद करताना बेल्जियमला उपउपांत्यपूर्व फेरीत हंगेरीवर ४-० असा दणदणीत विजय मिळवून दिला. १९८०च्या अंतिम फेरीतील पराभवानंतर बेल्जियमने पहिल्यांदा युरो चषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

दहाव्या मिनिटाला टॉबी अल्डेरवेरेल्डने हेडरद्वारे केलेल्या गोलनंतर बेल्जियमने सामन्यावर मजबूत पकड बनवली. २०१३मध्ये जपानविरुद्ध केलेल्या गोलनंतर अल्डेरवेरेल्डचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय गोल ठरला. साखळी सामन्यात ‘फ’ गटात पोर्तुगालला कडवी टक्कर देणाऱ्या हंगेरीने गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या. मात्र, बेल्जियमकडून मिशी बॅत्शुआयी (७८ मि.), ईडन हॅझार्ड (७९ मि.) आणि यान्निक करॅस्को (९०+) यांनी गोल करून ४-० असा विजय निश्चित केला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमसमोर वेल्सचे आव्हान असणार आहे.

१९६८

साली इटलीने युरो चषक उंचावला होता, तर २००० आणि २०१२ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.