लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने इंग्लंडवर सरशी साधत यूरो कप २०२०च्या विजेतेपदाचा मान पटकावला. होम का रोम, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असलेल्या चाहत्यांना वेम्बलीवर पेनल्टी शूटआउटचा थरार पाहायला मिळाला. स्पर्धेतील सर्वात जलद गोल करत दणदणीत सुरुवात करणाऱ्या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक तर दुसऱ्या सत्रात इटलीने गोल करत बरोबरी साधली होती. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल समोर आला नव्हता. पेनल्टी शू़टआउटमध्ये जेडन सँचो, साका आणि रॅशफोर्ड हे खेळाडू इंग्लंडसाठी गोल करण्यात अपयशी ठरले. तब्बल ५५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे इंग्लंडचे स्वप्न हे धूळीस मिळाले आहे.

पेनल्टी शूटआउटचा थरार

पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीच्या डॉमेनिको बेरार्डीने पहिला गोल मारला. त्यानंतर इंग्लंडच्या हॅरी केननं गोल झळकावत बरोबरी साधली. त्यानंतर इटलीच्या अँड्रिया बेलोट्टीचा गोल मिस झाला आणि इटलीवर दडपण वाढलं. त्यानंतर इंग्लंडच्या हॅरी मग्युरेने गोल झळकावत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर इटलीच्या लेओनार्डोने गोल मारत २-२ बरोबरी केली. मात्र दुसरा गोल हुकल्याने इटलीवरील दडपण कायम होतं. त्यानंतर इंग्लंडच्या मार्कस रॅशफोर्डचा गोल हुकला आणि इटलीच्या जीवात जीव आला. फेडेरिकोने गोल मारत इटलीला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आलेला जॅडॉन सँचोही इंग्लडला बरोबरी साधून देण्यास अपयशी ठरला. इटलीच्या जॉर्जिओने विजयी गोल मारण्यास अपयशी ठरला. त्यामुळे पाच गोलचा पेनल्टी शूट बरोबरी सुटेल अशी आशा होती. मात्र इंग्लंडचे खेळाडू सलग तीन गोल मारण्यात अपयशी ठरले. इंग्लंडच्या बुकायो साकाही गोल करण्यात अपयशी ठरला आणि इटलीने पेनल्टी शूटआउटमध्ये सामना ३-२ ने जिंकला.

सामन्यात पहिल्या सत्रापासून इंग्लंडची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. सामना सुरु झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉनं गोल झळकावत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे इटलीच्या संघावर दडपड होतं. मात्र दुसऱ्या सत्रात इटलीनं जोरदार कमबॅक केलं. ६७व्या मिनिटाला इटलीचा खेळाडू लिओनार्डो बोनच्चीने गोल करत इंग्लंडशी बरोबरी केली. त्यामुळे संघावरील दडपण दूर झालं. मात्र दोन्ही संघांना ९० मिनिटांच्या खेळात विजयी गोल झळकावता आला नाही. त्यामुळे ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. मात्र तिथेही दोन्ही संघ विजय करण्यास अपयशी ठरले. अखेर सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआउटमध्ये गेला आणि इटलीने सामना जिंकला.

इटलीचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

यूरो कप २०२० स्पर्धेत इटलीने एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत इटलीने टर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत करत बाद फेरीत धडक मारली होती. त्यानंतर बाद फेरीत ऑस्ट्रियाचा २-१ ने पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा २-१ ने धुव्वा उडवला. तर उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीने स्पेनचा ४-२ ने पराभव केला.