श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेनंतर भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. १४ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मजबूत संघ भारतात येणार आहे. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत खेळणार असल्यामुळे, बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाज हा सामना पाहण्यासारखा असणार आहे.

मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने बुमराहला एवढं घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. “माझ्यामते तुम्ही जितक्या जास्तवेळा त्याची गोलंदाजी खेळाल, तशी तुम्हाला सवय होईल. अधिकाधिक सरावामुळेच तुम्हाला त्याच्या गोलंदाजीतले बारकावे कळून येतील. त्यामुळे बुमराहला घाबरण्याची गरज नाही, असं माझं मत आहे.” फिंच पत्रकारांशी बोलत होता.

बुमराह हा निर्विवाद जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे, पण ज्यावेळी तुम्ही त्याच्याविरोधात खेळत नसाल…त्याला गोलंदाजी करताना पाहणं खूप चांगलं वाटतं. त्याच्याकडे गती आहे आणि त्याचा माराही अचूक टप्प्यावर असतो. त्यामुळे माझ्यामते बुमराहविषयी विचार करत बसण्यापेक्षा आम्हाला आमच्या फलंदाजीकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. प्रत्येक खेळाडूची काही बलस्थान असतात तर काही उणीवा असतात, त्यामुळे जे काही आव्हान असेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत, फिंचने संघाच्या तयारीविषयी आपलं मत मांडलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वन-डे सामना हा भारतीय संघाचा नवीन वर्षातला पहिला सामना असणार आहे.