करोना विषाणूच्या तडाख्यामुळे गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रिमीयर टी १० लीग स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक क्रिकेट मालिकांच्या तारखादेखील निश्चित केल्या जात आहेत. याच दरम्यान ICC ने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरपासून नियोजित करण्यात आला असून १७ जानेवारीपर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलियात असणार आहे.

टी-२० मालिका

पहिला सामना – ११ ऑक्टोबर (ब्रिसबेन)
दुसरा सामना – १४ ऑक्टोबर (कॅनबेरा)
तिसरा सामना – १७ ऑक्टोबर – (अ‍ॅडलेड)

टी २० विश्वचषक – १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर (ऑस्ट्रेलिया)

बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका

पहिली कसोटी – ३ ते ८ डिसेंबर (ब्रिसबेन)
दुसरी कसोटी (दिवस-रात्र) – ११ ते १५ डिसेंबर (अ‍ॅडलेड ओव्हल)
तिसरी कसोटी (बॉक्सिंग डे) – २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी (सिडनी)

वन डे मालिका

पहिला सामना – १२ जानेवारी २०२१ (पर्थ)
दुसरा सामना – १५ जानेवारी २०२१ (मेलबर्न)
तिसरा सामना – १७ जानेवारी २०२१ (सिडनी)

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं. याच कारणासाठी BCCI ने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. स्थानिक ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ४ मैदानांची नाव निश्चीत केली होती. आज त्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, २०१८-१९ मध्ये खेळवण्यात आलेली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका भारताने २-१ ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला. या बरोबरच भारतीय संघ हा ऑस्ट्रेलियाच्या भूमीत यजमानांना कसोटी मालिकेत पराभूत करणारा केवळ पाचवा पाहुणा संघ ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्याच भूमीवर इंग्लंड, विंडीज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या केवळ ४ संघांनी मात दिली होती. २०१८-१९च्या कसोटी मालिका विजयानंतर भारताचे नावही या यादीत सामील झाले.