भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सुपर ४ फेरीतील सामना बरोबरीत सुटला. कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. २५३ धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि भारताचे सर्व गडी तंबूत परतले. IPLमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या रशीद खानने दडपणाच्या क्षणी उत्तम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला मानसिक विजय मिळवून दिला. शतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद शेहजादला सामनावीर घोषित करण्यात आले.

या सामन्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानचा कर्णधार अजगर अफगाण याने भारताविरुद्ध दिलेली झुंज ही अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या. ‘भारतीय संघ हा स्पर्धेत अद्याप अजिंक्य आहे. अशा संघाला बरोबरीत रोखणे ही माझ्या आणि माझ्या संघासाठी अभिमानाची बाब आहे’, असे तो म्हणाला.

आशिया चषक स्पर्धेत आम्ही उत्तम खेळ केला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही पोहोचू शकलो नाही. पण आज स्पर्धेचा ज्या पद्धतीने आमच्या साठी शेवट झाला, ते पाहून माझा उर अभिमानाने भरून आलं आहे. हा सामना, ही स्पर्धा हे सारे ऐतिहासिक आहे, कारण या पूर्वी आम्ही अशा पद्धतीचे क्रिकेट कधीही खेळलो नाही, असेही त्याने नमूद केले.