महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघ मायदेशात आणि परदेशात चांगली कामगिरी करतो आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करतो आहे. विराट कोहलीच्या खेळीचं सर्व माजी खेळाडूंनी कौतुक केलं आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात विराटने आपल्या कसोटी कारकिर्दीतलं १८ वं आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटमधलं ५० वं शतक झळकावलं. या खेळीनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा विराट आणि सचिनच्या खेळाची तुलना व्हायला लागली. मात्र, इतक्यात विराटची तुलना सचिन तेंडुलकरशी करणं योग्य ठरणार नाही, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने म्हटले.

“विराटला अजून ५० शतकं करायची आहेत. त्यामुळे इतक्या लवकर सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण ज्या पद्धतीने विराट कोहली सध्या मैदानात खेळतोय, ते पाहता येत्या काही काळात तो सचिनचा विक्रम नक्की मोडू शकतो.” सामना संपल्यानंतर सौरव गांगुली पत्रकारांशी बोलत होता. दुसऱ्या डावात झळकावलेलं शतक हे विराट कोहलीचं इडन गार्डन्स मैदानावरचं पहिलं शतक ठरलं. या मालिकेतील अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत बाजी मारतो का, हे पहावं लागणार आहे.

पावसामुळे पहिल्या दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या डावात शिखर धवन आणि लोकेश राहुल जोडीने केलेली शतकी भागीदारी आणि त्यानंतर विराट कोहलीने झळकावलेलं शतक या जोरावर, सामन्यात दणक्यात पुनरागमन करत श्रीलंकेला विजयासाठी २३१ धावांचं आव्हान ठेवलं. दुसऱ्या डावातली भुवनेश्वर कुमारच्या माऱ्यासमोर श्रीलंकेच्या संघाची अवस्था दयनीय झाली होती. ७५/७ अशी अवस्था असताना अंधुक प्रकाशामुळे पंचांनी दोन्ही संघातील खेळाडूंच्या सहमतीने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

अवश्य वाचा – ….तर भारताला सामना जिंकता आला असता- लोकेश राहुल

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संधात भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना विश्रांती देण्यात आलेली असून तामिळनाडूच्या विजय शंकरला संघात स्थान देण्यात आलंय. २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.

अवश्य वाचा – भुवनेश्वर कुमार, शिखर धवनला विश्रांती; तामिळनाडूच्या विजय शंकरला संघात स्थान