महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात तिसऱ्या विश्वचषकाचा तुरा चॅम्पियन्स करंडकाच्या विजेतेपदानंतर मानाने खोवला गेला. यानंतर धोनीवर स्तुतीसुमनांचा वर्षांव चहूबाजूंनी होत असून ‘धोनीची अन्य कर्णधारांशी तुलना नको’ असा पवित्रा काही माजी खेळाडूंनी घेतला आहे.
कोणत्याही पिढय़ांची तुलना करता येत नाही. पण धोनी हा भारताचा काही नावाजलेल्या कर्णधारांपैकी एक आहे. निकाल त्याच्या बाजूने बोलत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पटकावलेले अव्वल स्थान आणि महत्त्वांच्या स्पर्धेमध्ये मिळवलेले जेतेपद असो, धोनीने भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असल्याचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सांगितले.
भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद म्हणाला की, भारताच्या विविध कर्णधारांना मिळालेले खेळाडूही त्या त्या काळानुसार दर्जेदार होते, त्यामुळे धोनीची अन्य कर्णधारांशी तुलना करता येणार नाही. धोनीने गोलंदाजांना स्वतंत्र्य दिले, त्याचबरोबर सर्व निर्णयांवर तो ठाम राहताना दिसतो. त्याने खेळाडूंना विश्वास दिला आणि त्याचेच फळ भारताला मिळाले.