आफ्रिकन देशांमधून फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी स्थान मिळवणे म्हणजे अग्निदिव्यच.  पात्रता फेरीत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर गांबिया, मोरोक्को आणि टांझानिया यांच्यावर सरशी साधून आयव्हरी कोस्टने दुसऱ्या फेरीतून आगेकूच केली. त्यानंतर सेनेगलवर सहज विजय मिळवून आयव्हरी कोस्टने सलग तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकात खेळण्याचा बहुमान मिळवला.गेल्या काही वर्षांपासून आफ्रिका देशांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा, पण अंतिम क्षणी कच खाणारा (चोकर्सचा शिक्का असलेला) आयव्हरी कोस्ट संघ सध्या सुवर्णकाळ अनुभवत आहे. २००६ आणि २०१०मध्ये फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरल्यानंतर आयव्हरी कोस्टच्या वाटय़ाला दोन्ही वेळेला ‘ग्रुप ऑफ डेथ’चे संकट आले. दोन्ही वेळेला चांगली कामगिरी करूनही आयव्हरी कोस्टला गटात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. २००६मध्ये अर्जेटिना आणि नेदरलँड्सने आयव्हरी कोस्टचा घात केला तर गेल्या वेळेला ब्राझील आणि पोर्तुगालसारखे दिग्गज संघ त्यांच्या वाटेत अडसर बनून उभे होते.  आयव्हरी कोस्टतर्फे सर्वाधिक गोल करणारा दिदियर द्रोग्बाची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असणार आहे. तसेच याया टौरे, सलोमन कलोऊसारखे अव्वल खेळाडू फॉर्मात असल्यामुळे आयव्हरी कोस्टसाठी बाद फेरी गाठण्याकरिता ही शेवटची संधी असणार आहे.
फुटबॉलमधील सर्वात आक्रमक आघाडीवीर असलेला दिदियर द्रोग्बा गेल्या दोन्ही वेळेला अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सर्वानीच टीका केली होती. पण दादा संघांविरुद्ध आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी द्रोग्बाला मिळाली नव्हती. या वेळी तुल्यबळ संघ गटात असल्यामुळे द्रोग्बा आपल्या गुणवत्तेची छाप पाडणार यात कोणतीच शंका नाही. २०१२मध्ये प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर साबरी लमोऊची यांनी आयव्हरी कोस्टचा मजबूत संघ तयार केला आहे. आधुनिक फुटबॉलची गरज असलेला बचावात्मक मधल्या फळीतील खेळाडू म्हणजे याया टौरे. आघाडीवीराच्या मागे खेळणारा याया टौरे प्रतिस्पध्र्याच्या बचाव फळीला चकवण्यात पटाईत असून ३० यार्डावरूनही गोल करण्याची क्षमता त्याच्यात आहे. आयव्हरी कोस्टसाठी द्रोग्बा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला असून त्याला सलोमन कलोऊ आणि गेव्‍‌र्हिनो यांची चांगली साथ लाभत आहे.

आयव्हरी कोस्ट (क-गट)
* फिफा क्रमवारीतील स्थान : २१

विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : ३ वेळा (२०१४ सह)

संभाव्य संघ
गोलरक्षक : बौबाकार बॅरी, सिल्व्हेन बोहोऊ, अली सांगरे बद्रा, सायुबा सांदे. बचाव फळी : कोलो टौरे, सोल बाम्बा, दिदियर झोकोरा, सर्जे औरियर, आर्थर बोका, बेंजामिन अँगोऊआ, ओस्माने व्हिएरा दिएरासोबा, कॉन्स्टन्ट जाकपा, ब्राइस जा जेडजे, जीन-डॅनियल अक्पा-अक्प्रो. मधली फळी : याया टौरे, चेईक टिओटे, सेरे डाय, मॅक्स ग्रॅडेल, दिओमांडे इस्माइल, दिदियर दा कोनान, मथिस बॉली. आघाडीची फळी : गेर्विन्हो, दिदियर द्रोग्बा, समोलन कलोऊ, विल्फ्रेड बोनी, सेयडोऊ दोम्बिया, लॅसिना ट्रॅओरे, जिओवानी सिओ.
ल्ल स्टार खेळाडू : दिदियर द्रोग्बा, याया टौरे, गेर्विन्हो, सलोमन कलोऊ.
ल्ल व्यूहरचना : ४-२-४ किंवा ४-३-३

* प्रशिक्षक :
साबरी लॅमोउची

*दिदियर द्रोग्बा
बलस्थाने आणि कच्चे दुवे
आक्रमक खेळ, प्रतिस्पध्र्यावर दबाब आणण्याची क्षमता, चेंडूवर ताबा मिळवल्यानंतर त्याला गोलजाळ्यापर्यंत पोहोचवण्याचे कसब हे आयव्हरी कोस्टच्या खेळाचे वैशिष्टय़ आहे. द्रोग्बा, विल्फ्रेड बोनी आणि सेयडोऊ डोम्बियासारखे वेगळ्या धाटणीचे आक्रमकवीर आयव्हरी कोस्टकडे आहेत. आघाडीची फळी मजबूत असली तरी ‘द एलिफंट्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयव्हरी कोस्टला बचावात सुधारणा करावी लागणार आहे. मधल्या फळीत वयस्कर खेळाडू आणि बचाव फळीतील गुणवत्तेचा अभाव यामुळे आयव्हरी कोस्टचा बचाव सहजपणे भेदला जाऊ शकतो. लमोऊची हे फिफा विश्वचषक २०१४मधील सर्वात युवा प्रशिक्षक ठरले आहेत. त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा फारसा अनुभव नसल्यामुळे आयव्हरी कोस्टचा प्रवास मर्यादित राहण्याचीच शक्यता अधिक आहे.

*याया टौरे
अपेक्षित कामगिरी
गेल्या दोन्ही वेळेला ‘ग्रुप ऑफ डेथ’मुळे आयव्हरी कोस्टचे आव्हान साखळीतच संपुष्टात आल्यामुळे यावेळीत्यांच्यासाठी सोपा गट मिळाला आहे. कोलंबिया वगळता चिवट झुंज देणारा संघ ‘क’ गटात नाही. रादामेल फलकावच्या भन्नाट कामगिरीमुळे कोलंबिया संघ गटात अव्वल स्थान पटकावेल, असा अंदाज आहे. त्यामुळे जपान आणि ग्रीस या दोन्ही संघांवर मात करून आयव्हरी कोस्टला फिफा विश्वचषकात पहिल्यांदाच बाद फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. बाद फेरीत मजल मारल्यास, आयव्हरी कोस्टची पुढील वाटचाल दिदियर द्रोग्बाच्या जादुई कामगिरीवर अवलंबून असणार आहे. ‘ड’ गटातून इटली अव्वल स्थानी मजल मारेल. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकासाठी उरुग्वे आणि इंग्लंड यांच्यात चुरस असणार आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत आयव्हरी कोस्टला स्थान मिळवायचे असल्यास, द्रोग्बालाच जादुई कामगिरी करावी लागणार आहे.