कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे.एन.पटेल यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. न्यायाधीश जे.एन.पटेल हे बीसीसीआयने आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि गैरव्यवहारप्रकरणी चौकशी समितीसाठी सुचविण्यात तीन सदस्यांपैकी एक आहेत.
तसेच शरद पवार यांनी या तीन सदस्यीय समितीत माजी कर्णधार रवी शास्त्री यांच्या समावेशावरही नापसंती दर्शविली. पवार म्हणाले की, मी न्यायाधीश जे.एन.पटेल यांना व्ययक्तीकरित्या ओळखत नाही परंतु, निर्माण झालेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरणे देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. बीसीसीआयने सुचविलेल्या तीन सदस्यीय समितीमध्ये जे.एन.पटेल यांचे नाव असल्याचे मला समजले. त्यानंतर बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव आणि जे.एन.पटेल एकमेकांचे नातेवाईक असल्याची चर्चा पुढे आली आहे.या बद्दल मलाही पुरेशी कल्पना नाही. त्यामुळे न्यायाधीश जे.एन.पटेल यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि ते नक्कीच देतील. तसे काही नसेल, तर बीसीसीआयने अशी चर्चा होण्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.” असेही पवार म्हणाले.
“रवी शास्त्री उत्तम खेळाडू आहेत. तसेच मी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना रवी शास्त्री आणि सुनिल गावसकर यांच्याशी बीसीसीआयने आर्थिक कंत्राट केले होते. त्यामुळे रवी शास्त्री बीसीसीआयशी आर्थिकरित्या नाते राहिलेले आहे. त्यामुळे बीसीसीआयशी आर्थिक जडणघडण राहिलेल्या व्यक्तीचा चौकशीत समितीत समावेश व्हावा हे न पटणारे आहे.” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयची तीन सदस्यीय समिती