३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना चेन्नईचा खेळाडू केदार जाधवच्या खांद्याला दुखापत झाल्याचं कळतंय. त्यामुळे केदार यापुढे आयपीएलचे सामने खेळणार नसल्याचं कळतंय.

“केदार जाधवची लवकरच वैद्यकीय तपासणी केली जाईल. तो लवकर बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. मात्र आयपीएलमध्ये आगामी सामन्यांमध्ये तो खेळेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे विश्वचषकाआधी तो बरा होणं हे आमचं उद्दीष्ट आहे.” चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी माहिती दिली.

१४ व्या षटकात ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर जाधव सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी रविंद्र जाडेजाने केलेला ओव्हरथ्रो थांबवण्यासाठी जाधवने प्रयत्नांची शिकस्त करत चेंडू थांबवला. मात्र या प्रयत्नात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. यानंतर चेन्नईच्या वैद्यकीय टीमने तात्काळ केदारवर उपचार केले. त्यामुळे आगामी काळात केदार दुखापतीमधून कधी सावरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.