एक वर्तुळ पूर्ण करून आयुष्य पुन्हा त्याच बिंदूपाशी येऊन थांबले आहे. ‘डॉलरमियाँ’ या नावाने क्रिकेटजगतात ओळखले जाणारे जगमोहन दालमिया म्हणजे खंदे क्रिकेट प्रशासक. साडेसहा वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटमधून ते हद्दपार झाले होते. पण रविवारी ते प्रभारी अध्यक्ष म्हणून पुन्हा परतले आहेत. परंतु हा वैयक्तिक विजय असल्याचे ते मानत नाहीत. मात्र क्रिकेटची प्रतीमा सुधारण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे खराब झालेल्या क्रिकेटला स्वच्छ करण्याचे आव्हान आपल्यापुढे असल्याचे दालमिया यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात, ‘‘हा माझा वैयक्तिक विजय नाही. क्रिकेटची प्रतीमा सुधारण्यासाठी ही काळाची गरज होती. मला अधिक वेगाने काम करायला हवे,’’ असे दालमिया यांनी सांगितले. चेन्नईत झालेल्या बीसीसीआयच्या तातडीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर ते कोलकात्यात परतले, तेव्हा आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘क्रिकेट हा स्वच्छ खेळ आहे, हे मी क्रिकेटजगताला दाखवून देईन आणि जनमानसात त्याचे पुन्हा चांगले स्थान निर्माण करेन.’’
क्रिकेटची प्रतीमा सुधारण्याच्या प्रक्रियेत तुम्ही आयपीएल सामने संपल्यानंतरच्या रात्रीच्या पाटर्य़ावर बंदी आणणार का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘‘ही शक्यता आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘लगेच निकाल देणारे औषध माझ्याकडे नाही किंवा अशी जादुसुद्धा आमच्याकडे नाही. आम्ही आमच्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करू.’’
७३ वर्षीय दालमिया यांनी यावेळी स्पष्ट केले की, बीसीसीआयमध्ये रिक्त झालेली पदे आपल्याला भरता येऊ शकतात. परंतु निर्णय घेण्यापूर्वी आम्ही अजय शिर्के यांच्या प्रतिसादाची अपेक्षा करीत आहोत.
‘‘जगदाळे राजीनामा परत घेण्याची सुतराम शक्यता नाही. आम्ही शिर्के यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही आणखी २४ तास वाट पाहू. लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर बीसीसीआयच्या नियमानुसारच आम्ही रिक्त पदे भरू,’’ असे दालमिया यांनी सांगितले.
आयसीसीच्या आगामी बैठकांमध्ये तुम्ही बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना दालमिया यांनी सांगितले की, ‘‘याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आयसीसीमध्ये मी कदाचीत प्रतिनिधित्व करेल किंवा करणार नाही.’’
रविवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या तातडीच्या बैठकीसंदर्भात ही घटनेनुसार नसल्याचे म्हटले होते. याविषयी दालमिया म्हणाले की, ‘‘ते त्यांचे वैयक्तिक मत होते. मी त्या मताशी सहमत नाही.’’ १९९६च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील आर्थिक घोटाळ्यांचा दालमिया यांच्यावर डिसेंबर २००६मध्ये ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगलचे अध्यक्षपद सोडावे लागले होते.