मुंबईची पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३३४ अशी स्थिती

रणजी करंडक  क्रिकेट स्पर्धा

जय बिश्तचे दमदार शतक आणि सिद्धेश लाड व विक्रांत औटी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे यजमान मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम सुरुवात केली. आघाडीच्या तीन फलंदाजांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे ४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३३४ अशी मजल मारली आहे.

वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईला बाद फेरी गाठण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय अनिवार्य आहे. त्यातच सौराष्ट्रने नाणेफेकजिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. मुंबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याने यजमानांवर दडपण आणण्याचा सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटचा मनसुबा होता. पण जय बिश्त आणि विक्रांत औटी या काहीशा नवोदित फलंदाजांनी पाहुण्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. बिश्त आणि औटी यांनी सलामीसाठी १७४ धावांची भागीदारी करत मुंबईला दणक्यात सुरुवात करून दिली.

विक्रांत काहीसा सावध खेळत असताना बिश्तने दुसऱ्या बाजूने आक्रमक फटकेबाजी केली. बिश्तने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक साजरे केले. अखेर डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मेद्रसिंह जडेजाने बिश्तला अर्पित वसवदाकरवी झेलबाद करत सौराष्ट्रला पहिले यश मिळवून दिले. बिश्तने १५० चेंडूंत २१ चौकारांसह १२७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर चार षटकांनी विक्रांत औटीही उनाडकटची शिकार ठरला. औटीने ६ चौकारांसह ५७ धावा फटकावल्या.

दोघेही सलामीवीर माघारी परतल्यानंतर कर्णधार सिद्धेश लाडने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण श्रेयस अय्यर (६), शुभम रांजणे (९) आणि आदित्य तरे (७) या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबईची १ बाद १९१ वरून ५ बाद २३२ अशी स्थिती झाली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएलच्या लिलावात पाच कोटी रुपयांची बोली लागलेला शिवम दुबे मैदानावर उतरला आणि त्याने सिद्धेश लाडसह मुंबईची पडझड रोखली. या दोघांनी अखेपर्यंत किल्ला लढवत सहाव्या गडय़ासाठी १०२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईला पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३३४ धावा उभारता आल्या. सिद्धेश १२ चौकार आणि १ षटकारासह ८४ धावांवर खेळत आहे तर शिवमने ३ चौकारांसह नाबाद ३४ धावा उभारल्या आहेत. सौराष्ट्रकडून जडेजाने तीन बळी मिळवले आहेत.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ८९ षटकांत ५ बाद ३३४ (जय बिश्त १२७, सिद्धेश लाड खेळत आहे ८४, विक्रांत औटी ५७, शिवम दुबे खेळत आहे ३४; धर्मेद्रसिंह जडेजा ३/८९) वि. सौराष्ट्र.