भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आगामी निवडणुकीत सचिवपदावर जय शाह आणि कोषाध्यक्षपदावर अरुणसिंग धुमाळ यांना निवडून आणण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

‘बीसीसीआय’च्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, या दृष्टीने रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय यांना सचिवपद आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण सिंग धुमाळ यांच्या नावांबाबत संघटकांचे एकमत झाले आहे. जय हे गुजरात क्रिकेट संघटनेचे आणि अरुण सिंग हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत. आसामच्या देबाजित सैकिया यांना संयुक्त सचिवपदासाठी उमेदवारी दिली जाणार आहे.

अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाबाबत रात्री उशिरापर्यंत एकमत होऊ शकले नाही. गांगुली यांना लोढा समितीच्या नियमानुसार कार्यकाळाचा मुद्दा येत्या काही काळात अडचणीचा ठरू शकतो.