३३-२७ असा विजय; मनजीतची दुखापत पलटनसाठी चिंतेची बाब
पूर्णपणे तंदुरूस्त नसतानाही मनजित चिल्लरला खेळवण्याचा निर्णय पुणेरी पलटण संघाच्या चांगलाच अंगलट आला. प्रो कबड्डी लीच्या चौथ्या हंगामातील कोलकाता टप्प्यात रविवारी जयपूर पिंक पँथर्सने ३३-२७ अशा फरकाने पुण्याचे आव्हान सहज परतवले. सलग दोन पराभवानंतर पँथर्सने दमदार पुनरागमन करून हा विजय मिळवला. पुण्याला मात्र सलग तिसऱ्या सामन्यात विजयाने हुलकावणी दिली. दुसऱ्या लढतीत पाटणा पायरेट्सनेही ३३-२७ अशा फरकाने यजमान बंगाल वॉरियर्सचा पराभव करून अव्वल स्थानावर झेप घेतली. बंगळुरु टप्प्यात तुलुगू टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर पुण्याकडून येथे चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, कमकुवत बचाव आणि चढाईतील त्रुटींमुळे त्यांना अपेक्षांवर खरे उतरता आले नाही. दुखापतीमुळे मनजीतही हतबल दिसला. ‘‘या लढतीत विजय मिळवणे आवश्यक होते. त्यामुळे मनजीतला खेळवण्याचा निर्णय घेतला. पण, आमचे डावपेच फसले. दुखापत हा या खेळाचा भाग आहे,’’ अशी प्रतिक्रीया पुण्याचे प्रशिक्षक के. भास्करन यांनी दिली. १४व्या मिनिटाला पँथर्सने लोण चढवून १२-७ अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत पूण्याला केवळ दोन गुण देत पँथर्सने १७-9 अशी सामन्यावर पकड बनवली. पँथर्सने पुण्याच्या फसलेल्या डावपेचांचा पुरेपूर फायदा उचलत विजय निश्चित केला. पँथर्सचा कर्णधार जसवीर सिंगची पकड झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेले संघ मालक अभिषेक बच्चन यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली. पत्रकारपरिषदेत याबाबत विचारले असता त्याने सारवासारव केली. पँथर्सने पुण्यावर चढवलेले दोन (१४ मि. व २५ मि.) लोण, हे या विजयात महत्त्वाचे ठरले. पँथर्सकडून चढाईत राजेश नरवाल व जसवीर सिंग यांनी प्रत्येकी ७, तर अजय कुमारने ५ गुण कमावले. पकडीत अमित हुडा (३) आणि रन सिंग (२) यांनी चोख कामगिरी बजावली. पुण्याकडून दीपक हुडा व अजय ठाकुर यांनी चढाईत प्रत्येकी 9 गुण कमवत संघर्ष केला.
बंगाल वॉरियर्सविरुद्ध प्रदीप नरवालने दोन चढाईत ५ गुणांसह लोणचे दोन गुण कमावल्यामुळे ३१व्या मिनिटापर्यंत १८-१८ अशा बरोबरीत असलेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने २५-१9 अशी आघाडी घेतली. प्रदीपची ही चढाई पाटण्याच्या ३३-२७ अशा विजयात महत्त्वाची ठरली, तर या पराभवामुळे बंगालचे आव्हान जव्पळपास संपुष्टात आले. अटीतटीच्या या लढतीत जँन कून लीने चढाईत दोन गुण पटकावून चुरस निर्माण केली, परंतु त्याला विजय मिळवण्यात अपयश आले. पाटण्याच्या विजयात प्रदीपसह (9) सुरजित सिंग (६) याने पकडीत, तर राजेश मोंडल व फाझेल अत्राचाली यांनी प्रत्येकी तीन गुण कमावत चोख भूमिका बजावली.