जसवीर सिंगच्या तुफानी चढायांच्या बळावर बलाढय़ जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सचा ३७१८ असा आरामात पराभव करून प्रो-कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. याचप्रमाणे यजमान यु मुंबाने बंगळुरू बुल्सला २७-२३ अशा फरकाने नमवून रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीतील आपले स्थान निश्चित केले.
पहिल्या उपांत्य सामन्यात कर्णधार राकेश कुमारला झालेल्या दुखापतीचा फटका पाटणा पायरेट्सचा बसला. पहिल्या सत्रात रवी दलाल आणि संदीप नरवाल यांच्या चढायांवर पाटण्याचा संघ विसंबून होता. परंतु त्याचा योग्य प्रभाव दिसून आला नाही.
जयपूरने १३व्या आणि १७व्या मिनिटाला दोन लोण चढवून मध्यंतराला २१-६ अशी वर्चस्वपूर्ण आघाडी मिळवली होती. त्यामुळे मुंबईतील सुरक्षेच्या दृष्टीने राखीव ठेवलेल्या पाकिस्तानच्या वासिम सज्जडला पाटण्याने दुसऱ्या सत्रात उतरवले. याचप्रमाणे राकेशनेही आपल्या चढायांची संख्या वाढवली. पण दुखापतीमुळे सावध खेळणाऱ्या राकेशला आणि डाव्या कोपरारक्षकाची भूमिका बजावणाऱ्या वासिमला दुसऱ्या सत्रात अपेक्षित प्रभाव पाडता आला नाही.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात यु मुंबाने पहिल्या सत्रात १५-९ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात बंगळुरूने चांगला प्रतिकार करीत दोन मिनिटे असताना लोणही चढवला. परंतु त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. यु मुंबाने कर्णधार अनुप कुमार आणि रिशांक देवाडिगा यांच्या चढायांच्या बळावर विजयावर मोहोर उमटवली. बंगळुरूकडून अजय ठाकूरने पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गणेशोत्सवाचा पहिला दिवस असूनही, वरळीच्या एनएससीआयचे क्रीडा संकुल कबड्डीरसिकांनी शुक्रवारी खच्चून भरले होते. जयपूरचे मालक अभिषेक बच्चन, अनुपम खेर, बिपाशा बसू आदी बॉलीवूडच्या मंडळींनीही उपस्थिती राखली होती.