सलग चार सामने गमावणाऱ्या जयपूर पिंकपँथर्स संघाला अखेर विजयाचा सूर गवसला. मंगळवारी जयपूरने बंगळुरू बुल्सवर ३६-२३ अशी मात करीत प्रो-कबड्डी लीगमध्ये पहिला विजय नोंदविला.
गतविजेत्या जयपूरने पूर्वार्धात १९-१५ अशी आघाडी घेतली होती. १९ व्या मिनिटापर्यंत ते १०-१५ अशा गुणांनी पिछाडीवर होते. मात्र १९ व्या मिनिटाला त्यांच्या कुलदीप सिंगने एकाच चढाईत चार गुण नोंदविले व तेथूनच सामन्याला कलाटणी मिळाली. पाठोपाठ जयपूरने पहिला लोण नोंदवला. उत्तरार्धातही त्यांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पकडी करीत बंगळुरूच्या मनजीत चिल्लर व राजेश मोंडाल यांना चांगलेच रोखून धरले. चिल्लर या हुकमी खेळाडूची अधिकाधिक वेळा पकड करीत त्याला बराच वेळ मैदानाबाहेर कसे ठेवता येईल, हे जयपूरने केलेले डावपेच यशस्वी ठरले.
जयपूरकडून कुलदीपने एका ‘सुपररेड’सह सात गुणांची कमाई केली. त्यामध्ये त्याने पकडीत मिळविलेल्या दोन गुणांचाही समावेश होता. जसवीर सिंगने चढाईत पाच व पकडीत तीन गुण मिळवीत अष्टपैलू कामगिरी केली. रोहित राणाने पकडीत पाच गुण मिळविले. बंगळुरू संघाकडून चिल्लरने सर्वाधिक चार गुण मिळविले.
जयपूरला पहिल्या चारही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यांच्या तुलनेत त्यांनी सुरेख सांघिक कौशल्य दाखवीत विजय मिळविला.

आजचे सामने
पुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्स
जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी