मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेनाने स्थानिक क्रिकेटमध्ये अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा आणि ३०० बळी अशी अनोखी कामगिरी जलल सक्सेनाने आपल्या नावावर जमा केली आहे. दुलिप करंडकात खेळत असताना जलजने हा अनोखा विक्रम केला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत १९ खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे.

जलज सक्सेनाच्या आधी सी.के.नायडू, लाला अमरनाथ, विजय हजारे, विनू मंकड, चंदू सरवटे, पॉली उम्रीगर, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे, एमएल जयसिम्हा, सलिम दुराणी, एस. वेंकटराघवन, एस. आबिद अली, मदन लाल, कपिल देव, रवी शास्त्री, मनोज प्रभाकर, साईराज बहुतुले आणि संजय बांगर या खेळाडूंनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे १९ जणांच्या या यादीपैकी १८ खेळाडूंनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे, मात्र जलजला अद्याप ही संधी मिळालेली नाही.

३२ वर्षीय जलजने २०१६/१७ साली मध्य प्रदेश संघाला रामराम करत केरळच्या संघाची साथ देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत जलजने भारत अ संघापर्यंत उडी मारली असली तरीही भारतीय संघात स्थान मिळवण्यात तो नेहमी अपयशी ठरला आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला जलज सक्सेनाच्या नावावर ३०५ बळी आणि ६ हजार ४४ धावा जमा आहेत.