फुटबॉल सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूशी भिडल्यामुळे अनेकदा फुटबॉलर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा वेळी त्या खेळाडूंना त्वरीत रूग्णालयात दाखल केले जाते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. पण भर सामन्यात अंगावर वीज पडल्याने एखाद्या खेळाडूला रुग्णालयात उपचार घ्यावे लागले असल्याचे कधी ऐकलं आहे? पण असं एका विद्यार्थ्यांच्या फुटबॉल सामन्यात खरोखर घडलं आहे. जमैकामध्ये खेळण्यात येणाऱ्या फुटबॉल सामन्यात काही खेळाडूंच्या अंगावर वीज पडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले आणि त्यांना उपचार घ्यावे लागले.

वोल्मर्स बॉइझ स्कूल आणि जमैका कॉलेज या दोन संघांमध्ये सोमवारी किंगस्टनच्या मैदानावर फुटबॉलचा सामना रंगला होता. त्या सामन्यात काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना भर सामन्यात वीज चमकली आणि ती वीज अंगावर पडून दोन खेळाडूंना त्याचा त्रास झाला. या वीज पडण्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये नेमकी वीज पडतानाची वेळ आणि त्यामुळे त्रास झालेले दोन खेळाडू स्पषेट दिसत आहेत. त्यात व्हिडीओत वीज अंगावर पडल्यामुळे दोन खेळाडू थेट मैदानावर गुडघ्यावर बसले आणि जमिनीवर कोसळले. त्या दोघांनीही स्वत:चे डोके पकडून ठेवले होते.

हा प्रकार घडल्यानंतर काही सेकंद सामना सुरू होता, पण फुटबॉल पुन्हा त्या खेळाडूंजवळ आला तेव्हा साऱ्यांना घडलेल्या प्रकाराचा उलगडा झाला. त्यानंतर लगेचच खेळाडू आणि प्रशिक्षक मैदानात आले आणि त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना लगेचच रूग्णालयात हलवण्यात आले.