जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेच्या अखेरच्या दिवशीही जमैकन खेळाडूंनी आपला दबदबा दाखवताना महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले स्पध्रेत जेतेपद पटकावले. क्रिस्टीयाना डे, शेरिका जॅक्सन, स्टेफिनी अ‍ॅन मॅकफेर्सन आणि नोव्हलेने विलियम्स मिल्स यांचा समावेश असलेल्या जमैकन संघाने ३ मिनिटे १९.१३ सेकंदाची वेळ नोंदवून जेतेपद पटकावले. अमेरिकेला ३:१९.४४ सेकंदासह रौप्य, तर ग्रेट ब्रिटनला २:२३.६२ सेकंदासह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिला गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अमेरिकेने पुरुषांमध्ये मात्र बाजी मारली. ४ बाय ४०० मीटर रिले स्पध्रेत अमेरिकेच्या डेव्हिड वेरबर्ग, टोनी मॅक्युय, ब्रिशॉन नेलम आणि लॅशॉन मेरीट यांनी २ मिनिटे ५७.८२ सेकंदाची वेळ नोंदवली. त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगोला २:५८.२० सेकंदासह रौप्यपदक, तर ग्रेट ब्रिटनने २:२५.५१ सेकंदासह कांस्यपदक जिंकले.
पुरुषांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत केनियाच्या अस्बेल किप्रोपने ३ मिनिटे ३४.४० सेकंदाची वेळ नोंदवून जेतेपद पटकावले. केनियाच्याच एलिजाह मोटोनेई मनागोईने (३:३४.६३) रौप्यपदक आणि मोरॅकोच्या अ‍ॅबदालाटी इग्वेडरने (३:३४.६७) कांस्यपदक जिंकले.