‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ असं बिरुद त्याच्या चाहत्यांनी दिलं होतं. तो रेसिंग ट्रॅकवर धावायला लागला की वाऱ्यालाही त्याचा गतीचा हेवा वाटायचा, स्पर्धा ऑलिम्पिकची असो किंवा वर्ल्ड चॅम्पियनशीपची प्रत्येक स्पर्धेत तो ट्रॅकवर उतरला की विजेतेपद हे जणू त्याची वाटचं बघत असायचं….मात्र आपल्या कारकिर्दीचा शेवट त्याला काही गोड करता आला नाही. वर्ल्ड अॅथलेटिस्कस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत जमैकाच्या उसेन बोल्टला अंतिम फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने ही शर्यत ९.९२ सेकंदांमध्ये पूर्ण केली. तर अमेरिकेच्याच क्रिश्चन कोलमनने ९.९४ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक आपल्या नावे केलं. मात्र खराब सुरुवात झाल्याने युसेन बोल्टला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. बोल्टने ९.९५ सेकंदांमध्ये अंतिम रेषा पार केली.

वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपनंतर आपण कारकिर्दीची सांगता करणार असल्याचं बोल्टने याआधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे जगभरातील क्रीडारसिकांच्या नजरा काल लंडन येथे होणाऱ्या १०० मिटर ट्रॅकवर खिळलेल्या होत्या. मात्र एरवी आपल्या प्रतिस्पर्ध्याची खिल्ली उडवत अंतिम रेषा पार करणारा बोल्ट कालच्या शर्यतीत झगडताना दिसला. सुरुवात खराब झाल्यामुळे बोल्टला या स्पर्धेत सुवर्णपदाकाची कमाई करता आली नाही.

मात्र शेवटची स्पर्धा असल्यामुळे बोल्टला पहायला त्याच्या चाहत्यांनी मैदानात गर्दी केली होती. स्पर्धा संपल्यानंतर कित्येक वेळ मैदानात बोल्टच्या नावाचा जयजयकार होताना पहायला मिळाला. इतकचं नव्हे तर सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या गॅटलिनने गुडघ्यावर बसून मुजरा करत बोल्टच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा सन्मान केला. यावेळी बोल्टनेही उपस्थित प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढले. बोल्टच्या निवृत्तीमुळे रेसिंक ट्रॅकवरचं एक वादळ आज काही क्षणांसाठी शांत झाल्याची भावना अनेक चाहच्यांनी व्यक्त केली आहे.

बोल्टच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावरही चाहत्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली.