लंडन : जेम्स अँडरसन हा इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याने इंग्लंडच्या आक्रमणाची धुरा यापुढेही सांभाळत प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांवर दहशत निर्माण करावी, असा आशावाद कर्णधार जो रूटने प्रकट केला.

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राला मागे टाकत अँडरसन (५६४ बळी) कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमधील पहिल्या तीन स्थानांवर मुथय्या मुरलीधरन (८०० बळी), शेन वॉर्न (७०८ बळी) आणि अनिल कुंबळे (६१९ बळी) हे तीन फिरकी गोलंदाज आहेत.

‘‘जेम्सने त्याच्यातील क्षमतेच्या बळावरच हे यश मिळवले आहे. आता सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या फिरकी गोलंदाजांना मागे टाकण्याचे आव्हान त्याच्यापुढे असेल. भविष्यातील अनेक मालिकांचे आव्हान इंग्लंडपुढे आहे. त्यात तो संघाच्या आक्रमणाची यशस्वीपणे धुरा वाहील,’’ असे रूटने सांगितले.

अँडरसनने भारताच्या अखेरच्या फलंदाजाला बाद करून इंग्लंडच्या मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. याबाबत रूट म्हणाला, ‘‘आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतावर मिळवलेला विजय हा इंग्लंडच्या संघाचा आलेख उंचावत असल्याचे स्पष्ट करतो. आगामी श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्ये हेच सातत्य आम्ही टिकवू.’’

अँडरसन सहाशे बळींचा टप्पा ओलांडेल  -मॅकग्रा

लंडन : जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सहाशे बळींचा टप्पा ओलांडेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केला आहे. याबाबत मॅकग्रा म्हणाला, ‘‘जेम्स अजूनही पूर्णत: तंदुरुस्त आहे. त्याने माझा बळींचा आकडा पार केला आहे. लवकरच तो सहाशे बळीसुद्धा सहज पूर्ण करील.’’