ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या नावावर खास विक्रम नोंदवला आहे. ३८ वर्षीय अँडरसन इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. या विक्रमासह त्याने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकची बरोबरी साधली. कुकने आपल्या कसोटी कारकीर्दीत इंग्लंडकडून १६१ कसोटी सामने खेळले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अँडरसन खेळला, तर तो कुकलाही मागे टाकत मोठ्या पराक्रमाची नोंद करेल.

हेही वाचा – ‘‘मी आतून खचले होते”, करोनामुळे आई आणि बहिणीला गमावलेल्या क्रिकेटपटूने सांगितला भयानक अनुभव!

इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा एकमात्र खेळाडू होण्यापासून अँडरसनचा फक्त एक कसोटी सामना दूर आहे. अँडरसन इंग्लंडच्या भूमीवर आपला ९०वा कसोटी सामना खेळत आहे. या कामगिरीसह त्याने कुक आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉचा विक्रम मोडला आहे. कुक आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यांनी घरच्या मैदानावर ८९ कसोटी सामने खेळले.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने या विक्रमात ९४ कसोटी सामने खेळले आहेत. रिकी पॉन्टिंगने घरच्या मैदानावर ९२ कसोटी सामने खेळले आहेत. या प्रकरणात अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी आनंदवार्ता..! आता दरवर्षी होणार भारत-पाकिस्तान सामना

इंग्लंडकडून दोन खेळाडूंनी केले पदार्पण

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात दोन खेळाडूंनी इंग्लंड संघात पदार्पण केले आहे. इंग्लंड संघाकडून जेम्स ब्रेसी (यष्टीरक्षक) आणि ऑली रॉबिन्सन यांनी पदार्पण केले आहे. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ब्रेसी ६९८वा, तर रॉबिन्सन ६९९वा खळाडू ठरला.