News Flash

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा  : महाराष्ट्राचा सलग दुसरा पराभव

पदार्पणवीर दिग्विजयच्या अर्धशतकानंतरही जम्मू आणि काश्मीरविरुद्ध ५४ धावांनी पराभूत

| December 21, 2019 04:16 am

२७-६-८६-४ उमर नझीर

पदार्पणवीर दिग्विजयच्या अर्धशतकानंतरही जम्मू आणि काश्मीरविरुद्ध ५४ धावांनी पराभूत

पुणे : एका दिवसापूर्वीच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघात निवड झाल्याचा आनंद दिग्विजय देशमुख फार काळ साजरा करू शकला नाही. २१ वर्षीय पदार्पणवीर दिग्विजयच्या झुंजार अर्धशतकानंतरही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील दुसऱ्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरने महाराष्ट्राला ५४ धावांनी पराभूत केले.

महाराष्ट्राचा दुसरा डाव ३६४ धावांचा पाठलाग करताना उमर नझीरच्या (४/८६) भेदक गोलंदाजीपुढे ३०९ धावांत आटोपला. सामन्यांत एकूण नऊ बळी घेणारा नझीरच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सलग दोन विजयांसह जम्मूने गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे, तर महाराष्ट्र मात्र सलग दुसऱ्या पराभवामुळे आठव्या स्थानी घसरला आहे. महाराष्ट्राचा पुढील सामना २५ डिसेंबरपासून छत्तीसगडविरुद्ध रंगणार आहे.

गुरुवारच्या ५ बाद १९२ धावांवरून पुढे खेळताना अंकित बावणे (३२) आदल्या दिवशीच्या धावसंख्येत फक्त एका धावाची भर घालून माघारी परतला. मात्र आठव्या क्रमांकावर आलेल्या दिग्विजयने ७१ चेंडूंतच सात चौकार आणि पाच षटकारांसह ८३ धावा फटकावून महाराष्ट्राला विजयाच्या दिशेने नेले; परंतु तळाच्या फलंदाजांकडून त्याला पुरेशी साथ लाभली नाही. अखेरीस नझीरनेच दिग्विजयचा अडथळा दूर करून जम्मूचा विजय सुनिश्चित केला. नझीरव्यतिरिक्त मोहम्मद मुद्दासिरनेही चार बळी मिळवून महाराष्ट्राला ३०९ धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.

संक्षिप्त धावफलक

* जम्मू आणि काश्मीर (पहिला डाव) : २०९

* महाराष्ट्र (पहिला डाव) : १०९

* जम्मू आणि काश्मीर (दुसरा डाव) : २६३

* महाराष्ट्र (दुसरा डाव) : ८६.१ षटकांत सर्व बाद ३०९ (दिग्विजय देशमुख ८३, ऋतुराज गायकवाड ७१; उमर नझीर ४/८६).

* सामनावीर : उमर नझीर

* गुण : जम्मू आणि काश्मीर ६, महाराष्ट्र ०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 4:16 am

Web Title: jammu and kashmir beat maharashtra by 54 runs in ranji trophy group c match zws 70
Next Stories
1 कतार आंतरराष्ट्रीय  वेटलिफ्टिंग स्पर्धा : मीराबाई चानूला सुवर्णपदक
2 निती अधिकाऱ्यांपुढे साक्ष देण्याचे शांता रंगास्वामी यांना आदेश
3 पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका : श्रीलंकेला पहिल्या डावात आघाडी
Just Now!
X