जम्मू आणि काश्मीरकडे २५५ धावांची आघाडी

पुणे : गहुंजे येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या साखळी सामन्यात फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे महाराष्ट्राचा संघ अडचणीत सापडला आहे. मध्यमगती गोलंदाज उमर नझीरच्या (५/३०) भेदक माऱ्यापुढे महाराष्ट्राचा पहिला डाव १०९ धावांत आटोपल्यावर दुसऱ्या दिवसअखेरीस जम्मूने २५५ धावांची आघाडी घेऊन सामन्यावरील पकड मजबूत केली आहे.

मंगळवारच्या ३ बाद ५१ धावांवरून पुढे खेळताना महाराष्ट्राच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. सलामीवीर मोर्तझा ट्रंकवाला (३१) वगळता महाराष्ट्राचा एकही फलंदाज १५हून अधिक धावा करू शकला नाही. उमरने पाच, तर अबिद मुश्ताकने दोन बळी मिळवून महाराष्ट्राचा डाव अवघ्या ४१.१ षटकांत १०९ धावांत गुंडाळला. त्यामुळे जम्मूला पहिल्या डावात १०० धावांची आघाडी मिळाली.

प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात सूर्याश रैना (नाबाद ७९) आणि फाझिल रशीद (४३) यांनी चौथ्या गडय़ासाठी १०५ धावांची भागीदारी रचल्यामुळे जम्मूने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १५५ धावा केल्या आहेत. त्यामुळे हरियाणाविरुद्धची सलामीची लढतही एक डाव आणि ६८ धावांनी गमावणाऱ्या महाराष्ट्रावर सलग दुसऱ्या पराभवाचे सावट निर्माण झाले आहे.

संक्षिप्त धावफलक

* जम्मू आणि काश्मीर (पहिला डाव) : २०९

* महाराष्ट्र (पहिला डाव) : ४१.१ षटकांत सर्व बाद १०९ (मोर्तझा ट्रंकवाला ३१, अनुपम संकलेचा १३; उमर नझीर ५/३०)

* जम्मू आणि काश्मीर (दुसरा डाव) : ५० षटकांत ४ बाद १५५ (सूर्याश रैना खेळत आहे ७९, फाझिल रशीद ४३; अनुपम संकलेचा २/२७)