जागतिक महिला  बॉक्सिंग स्पर्धा

पीटीआय, उलान-उदे (रशिया)

जमुना बोरोने दिमाखदार विजयासह ५४ किलो वजनी गटाची उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या अभियानाची विजयी सुरुवात केली.

धिम्या गतीने सुरुवात करणाऱ्या जमुनाने मोंगोलियाच्या मिशिदमा एर्डेनेडालायचा ५-० असा धुव्वा उडवला. जागतिक स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या जमुनाने सुरुवातीला सावध पवित्रा स्वीकारला. मात्र अखेरच्या तीन मिनिटांत तिने मिशिदमावर वर्चस्व गाजवले. आसाम रायफल्समध्ये कार्यरत असणाऱ्या २२ वर्षीय जमुनाची पुढील फेरीत अल्गेरियाच्या पाचव्या मानांकित ओयकित स्फोऊशी गाठ पडणार आहे. २०१७च्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्फोऊला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे.

शनिवारी माजी राष्ट्रीय विजेती नीरज (५७ किलो) आणि स्वीटी बोरा (७५ किलो) यांच्यावर भारताची धुरा असेल. नीरजची सलामी चीनच्या क्विओ जीरूशी होईल, तर स्विटीचा मोंगोलियाच्या म्यागमारजार्गल मुंखबातशी सामना होणार आहे.