सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे सण-समारंभ, सोहळे, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मनाई आहे. कृष्णजन्म आणि गोकुळाष्टमीचा उत्साह देशभरात नेहमी दिसतो, पण यावर्षी त्यावर काही अंशी विरजण पडल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते युवराज सिंग साऱ्यांनी कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.

मुंबईकरांचा लाडका संघ ‘मुंबई इंडियन्स’नेदेखील एका विशेष फोटोच्या माध्यमातून साऱ्यांना गोकुळाष्टमी आणि दहीकाल्याच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोत दहीहंडीसाठी थर लावलेल्या गोविंदांचा फोटो आहे. दहीहंडीचे थर आणि क्रिकेट यांच्यातील एक महत्त्वाचे कनेक्शन या फोटोच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. जसे हंडीच्या थराच्या बाजूला लोक उभे असतात तसे सामन्यासाठी प्रेक्षक म्हणजे पलटण (Paltan) असते. खालच्या दोन थरातील गोविंदा (Core) हे संघाचा भार वाहणाऱ्या महत्त्वाच्या गोविंदांसारखे असतात. मधल्या थरांवरील गोविंदा (Anchors) म्हणजे सामन्यातील मधल्या फळीतील फलंदाजांप्रमाणे असतात. खालच्या आणि वरच्या फळीतील समतोल राखणं त्यांची जबाबदारी असते. संपूर्ण सामन्यात आणि डावात एका फलंदाजाला गड राखण्यासाठी उभं राहावं लागतं. इतर खेळाडू फटकेबाजी करत असताना त्याने संयमी खेळी करत संघाला पाठिंबा द्यायचा असतो. तसा हंडीच्या थरातील बाजूने आधार देणारा गोविंदा (Backbone) असतो. तर हंडी फोणारा गोविंदा (Finisher) हा मॅच फिनिशर सारखा असतो. विजयाचा कळस चढवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते.

जन्माष्टमीचा सण देश-विदेशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दोन दिवस चालणारा हा उत्सव खूप खास असतो. सामान्य माणसापासून सेलिब्रिटीपर्यंत साऱ्यांकडे जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. पण करोनाचा धोका लक्षात घेता भारतीय क्रिकेटपटूंनी यावेळी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.