जपान ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यत

मर्सिडिझ संघाच्या वाल्टेरी बोट्टास याने तिसऱ्या क्रमांकावरून दमदार कामगिरी करत फेरारीचा सेबॅस्टियन वेट्टेल आणि मर्सिडिझचा सहकारी लुइस हॅमिल्टन यांना मागे टाकत जपान ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे विजेतेपद पटकावले.

फेरारीचा दुसरा ड्रायव्हर चार्लस लेकलेर्क याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, पण दोन्ही खेळाडूंनी अव्वल तीन जणांमध्ये मजल मारल्यामुळे मर्सिडिझने सांघिक विजेतेपदावरही नाव कोरले. ‘‘तिसऱ्या क्रमांकावरून सुरुवात करताना विजय मिळवणे अवघड असते. मला चांगली सुरुवात करता आली. सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवत मी आघाडी राखली होती. त्यानंतर वेग कायम राखत मी विजेतेपद पटकावले. मी खूपच आनंदी आहे,’’ असे वाल्टेरी बोट्टासने सांगितले.

सुरुवात करतानाच योग्य नियंत्रण न राखता आल्यामुळे वेट्टेलला आपले अग्रस्थान गमवावे लागले. फेरारीपेक्षा मर्सिडिझच्या कारचा वेग जास्त असल्याचे आणि आपली चूक झाल्याचे वेट्टेलने मान्य केले. त्याला दुसऱ्या तर हॅमिल्टनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत हॅमिल्टन ३३८ गुणांसह अग्रस्थानी असून बोट्टासने २७४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.