X

Japan Open 2018 : श्रीकांत, प्रणॉय, सिंधूची विजयी सलामी

पी.व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय तिघेही दुसऱ्या फेरीत

भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचा पहिला दिवस यश देणारा ठरला. पी.व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय या भारताच्या तिन्ही प्रमुख खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

सिंधूला पहिल्या सामन्यात विजय मिळाला असला तरी त्यासाठी तीन गेममध्ये संघर्ष करावा लागला. जपानच्या सायाका ताकाहाशीविरुद्ध सिंधूने हा सामना २१-१७, ७-२१, २१-१३ असा जिंकला. पुढील सामन्यात सिंधूला चीनच्या फॅँगजे गाओविरुद्ध झुंजावे लागणार आहे. फॅँगजेने भारताच्या जक्का वैष्णवी रेड्डीला २१-१०, २१-८ असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली आहे.

त्यामुळे या लढतीत विजय मिळवत आगेकूच करण्यासाठी सिंधूला पुन्हा चांगला संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. पुरुषांच्या गटात भारताच्या प्रणॉयने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीवर २१-१८, २१-१७ अशी सरळ दोन गेममध्ये मात केली, तर श्रीकांतने त्याचा चिनी प्रतिस्पर्धी युझिआंग हुआंगवर २१-१३, २१-१५ असा दोन गेममध्ये विजय मिळवला. प्रणॉयला पुढील लढतीत इंडोनेशियाच्याच अ‍ॅन्थोनी सिनीसुकाशी, तर श्रीकांतला हॉँगकॉँगच्या विन्सेंट वोंग विंग की याच्याशी झुंजावे लागणार आहे. मात्र दुसरीकडे भारताच्या समीर वर्मा याला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराम रॅन्कीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला.

 प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीने मलेशियाच्या मॅथ्यू फोगार्टी आणि इसाबेल झॉँग या जोडीचा २१-९२१-६ असा पराभव करीत पुढील फेरी गाठली आहे. त्यांना पुढील सामन्यात मलेशियाच्या पेंग सुन चॅँग आणि लिऊ यिंग गोह या जोडीसमवेत लढावे लागणार आहे.

  • Tags: pv-sindhu,