भारताच्या किदम्बी श्रीकांतचे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. श्रीकांतचा सलामीचा सामना सहकारी एच. एस. प्रणॉयशी झाला. या सामन्यात प्रणॉयने त्याला १३-२१, २१-११, २२-२० असे ३ गेममध्ये पराभूत केले. सामन्यातील पहिला गेम प्रणॉयने जिंकला होता. त्याने २१-१३ अशा मोठ्या फरकाने गेम खिशात घातला होता, पण नंतर प्रणॉयने दमदार पुनरागमन केले. त्याने दुसरा गेम २१-११ असा दणदणीत फरकाने जिंकला. तिसरा गेम चांगलाच रंगला. पण अखेर २२-२० अशा फरकाने प्रणॉयच सरस ठरला.

दुसरीकडे डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सन याने भारताच्या समीर वर्माला २१-१७, २१-१२ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

मंगळवारी केंटो निशिमोटोचा सरळ गेममध्ये पराभव करून भारताच्या बी. साई प्रणीतने जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या ‘वर्ल्ड टूर सुपर ७५०’ दर्जाच्या या स्पर्धेत बिगरमानांकित प्रणीतने जपानच्या निशिमोटोचा ४२ मिनिटांत २१-१७, २१-१३ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याची जपानच्या कांटा सुनेयामाशी गाठ पडणार आहे.

मिश्र दुहेरीत सत्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनीही दिमाखदार विजयासह अभियानाला प्रारंभ केला. या जोडीने जर्मनीच्या माव्‍‌र्हिन सेडेल आणि लिंडा ईफ्लर यांचा २१-१४, २१-१९ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमित बी. रेड्डी जोडीचे आव्हान संपुष्टात आले. मलेशियाच्या गोह शे फेई आणि नूर इझुद्दीन जोडीने त्यांचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला.

आता पाचव्या मानांकित सिंधूचा चीनच्या यूई हॅनशी सामना होणार आहे.