जपानची अव्वल महिला बॅडमिंटनपटू नोझोमी ओकुहाराने ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. दुसऱ्या सीडेड ओकुहाराने अंतिम सामन्यात थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगला 21-12, 21-16 असे सहज हरवले. 2016मध्ये ओकुहाराने ही स्पर्धा जिंकली होती.

विजयानंतर ओकुहारा म्हणाली, “पुन्हा एकदा ऑल इंग्लंडची चॅम्पियन झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मला इतर सामन्यांप्रमाणे अंतिम फेरीमध्येही खेळायचे होते. या सामन्यात मला माझे शॉट्स खेळायचे होते. चोचूवाँगचा हा पहिला अंतिम सामना होता. मला वाटते की, तिच्यावर थोडा दबाव होता.”

 

ओकुहारा म्हणाली, “पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी येथे विजेतेपद जिंकले, तेव्हा मला कोणताही दबाव जाणवला नाही. यावेळी मी महिला एकेरीच्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये होतो. त्यामुळे परिस्थिती बदलली. माझी एकूण कामगिरी उच्च दर्जाची झाल्याने मला आनंद झाला आहे.”

सिंधुमुळे भारताचे आव्हान संपुष्टात

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधुचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले. अंतिम फेरीत पोहोचलेल्या थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगने उपांत्य फेरीत सिंधूचा सहज फडशा पाडला. सिंधूच्या पराभवामुळे भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. चोचूवाँगने सिंधूला 43 मिनिटांतच 21-17, 21-9 असे सहज पराभूत केले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूला 2018मध्येही उपांत्य फेरीतच हार पत्करावी लागली होती.