ही गेल्या वर्षीचीच गोष्ट. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत तिला सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला लागल्यापासून चार वर्षांतच तिचा असा दारुण पराभव कधीच झाला नव्हता. हा पराभव बाजूला सारत ती अँटवर्पला रवाना झाली. त्याही स्पर्धेत प्राथमिक फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आले. क्रीडापटूंच्या आयुष्यात असे क्षण येतात हे समजून घेत ती दुबईत पोहचली आणि प्राथमिक लढतीतच ती गारद झाली. पराभवाचा इजाबिजातिजाही झाला. सलग तीन स्पर्धामध्ये सुमार कामगिरी झाल्याने जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंच्या यादीतून ती बाहेर फेकली गेली. सगळे डावपेच अयशस्वी ठरत होते. नक्की कसं खेळावं हा यक्षप्रश्न तिच्यासमोर होता. दुसऱ्या कशात तरी मन रमवावं म्हणून ती पोलंडमधल्या मूळ गावी गेली. टेनिससाठी कुटुंबापासून दूर राहणं स्वीकारलं, सणसमारंभ-स्नेहमेळावे सोडून दिले. टेनिसची रॅकेट हाती घेऊन स्वीकारलेला ‘एकला चलो रे’ मार्ग योग्य आहे का? हा प्रश्न तिच्या मनात रुंजी घालत होता. याच अस्वस्थतेतून तिने दोन ई-मेल केले. एक होता अमेरिकेतल्या नेवाडे इथल्या टेनिस अकादमीचे प्रमुख डॅरेन काहील यांना. शिबिरादरम्यान सरावासाठी टेनिस कोर्ट उपलब्ध करून देण्याची विनंती होती. दुसरा ई-मेल केला थेट तिची आदर्श असणाऱ्या स्टेफी ग्राफला. स्टेफीचा आणि अँजेलिक्यू कर्बरचा देश एकच, जर्मनी. ‘तुला केव्हाही मदत लागली तर सांग,’ असं आश्वासन स्टेफीने तिला दिलं होतं. मार्गदर्शनासाठी तिने आर्जव केलं. मेल पाहून स्टेफीने तिला फोनच केला. कधी आणि कुठे येऊ असं सहजपणे विचारलं. स्टेफीच्या वागण्याने ती भारावली. पुढचे तीन दिवस ती ‘स्टेफी’मय होती. तिच्या बारीकसारीक प्रश्नांची स्टेफीने उत्तरं दिली. ती कुठे चुकतेय हे सांगण्यासाठी स्वत: खेळलीही. या तीन दिवसांत मनातली अस्वस्थता दूर झाली आणि निरभ्र आकाश तिला साद घालू लागलं. टोरबेन बेल्ट्झ या नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तिने खेळायला सुरुवात केली.

वर्षभराने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने तिने पुन्हा मेलबर्न गाठले आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली, आणि तो दिवस समोर आला- शनिवारची संध्याकाळ. समोर सेरेना विल्यम्स. जिंकण्याच्या यंत्रवत सातत्यासाठी प्रसिद्ध सेरेनाला खुणावत होतं तब्बल २२वे ग्रँड स्लॅम जेतेपद. या जेतेपदासह स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी सेरेनाकडे होती. त्यामुळे या विक्रमाशी बरोबरी म्हणजे साक्षात स्टेफीपर्वाची पुनरावृत्ती करण्यासारखं. महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सेरेना म्हणजे जेतेपद निव्वळ औपचारिकता. निवेदक तिचं नाव घेतो. किटचा पसारा घेऊन ती कोर्टवर येते. समस्त चाहते टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करतात आणि तिच्या निळ्या डोळ्यात वेगळीच चमक दिसते. पुढच्या दीड तासात जर्मनी आणि स्टेफी ग्राफ यांच्याशी संलग्न प्रत्येक गुणवैशिष्टय़ाला जागत ती अफलातून खेळते आणि चक्क सेरेनाला चीतपट करते. सेरेनाला नमवण्यासाठी तिच्यासारख्याच घोटीव आणि सर्वसमावेशक खेळाची गरज होती. अगदी तस्साच खेळ करत  तिने जेतेपद पटकावले. कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून थेट जेतेपदाला गवसणी घातली. जेतेपदासह कर्बरने गुरू स्टेफी ग्राफच्या विक्रमापासून सेरेनाला दूर ठेवत आगळी-वेगळी गुरुदक्षिणाही दिली.

पोलंडचे स्लाओमीर आणि जर्मनीच्या बिइटा यांची ही लाडकी लेक. तिसऱ्या वर्षीच टेनिसची रॅकेट हाती घेतलेल्या कर्बरने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचण्यासाठी बराच वेळ घेतला. सातत्याचा अभाव हे महिला टेनिसला लागलेलं ग्रहण कर्बरच्या खेळातही दिसून येत असे. सुदृढ शरीरामुळे कर्बरकडे ताकद होती. जोरकस आणि अचूक फटक्यांची निवड ही तिची खासियत होती. सव्‍‌र्हिस राखण्यासाठी आणि भेदण्यासाठी कोर्टवरचा वावर निर्णायक ठरतो. या आघाडीवर कर्बरचे वेगळेपण दिसून येतं. जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टी असूनही विजयापासून ती दूरच राहत असे. खेळता खेळता नकारात्मक विचारांनी गर्दी केल्यामुळे कर्बरने अनेकदा सामने गमावले. २०१४ मध्ये याचीच परिणती नैराश्यग्रस्त होण्यात झाली. पण जर्मन बाणा जागृत होता. स्टेफीच्या शब्दांनी जर्मन बाण्यात जान फुंकली आणि कणखर, चिवट आणि परिपक्व कर्बर समोर आली. गेल्या वर्षी २७ सामन्यात तिने प्रतिस्पध्र्याना तिसऱ्या सेटपर्यंत झुंजायला लावलं. यापैकी व्हिक्टोरिया अझारेन्काविरुद्धची लढत चांगलीच गाजली होती. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सहजासहजी पराभव न पत्करणाऱ्या खेळाडूंमध्ये कर्बरची गणना होते.

स्टेफी ग्राफ प्रेरित घोटीव सातत्य, कमालीची अचूकता, प्रचंड ऊर्जा, चिवट तंदुरुस्ती आणि निग्रह या खास जर्मन पैलूंच्या बळावर मिळवलेले जेतेपद जर्मन योगायोगच म्हणायला हवा.

parag.phatak@expressindia.com