वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवत विंडीज दौऱ्याचा शेवट गोड केला. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक माऱ्याने विंडीजच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. आपल्या यॉर्कर चेंडूसोबतच बुमराहने विंडीजविरुद्ध मालिकेत आऊटस्विंग चेंडूंचाही मोठ्या खुबीने वापर केला. त्याच्या या कामगिरीचं कर्णधार विराट कोहलीसह सर्वांनीच कौतुक केलं. भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेनेही जसप्रीतच्या कामगिरीची प्रशंसा केली असून, त्याच्यात भारताचा सर्वोत्तम जलदगती गोलंदाज होण्याची क्षमता असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा –  रविचंद्रन आश्विन अजुनही भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू !

“बुमराहच्या कामगिरीत सातत्य आहे, त्याला बळी कसे मिळवायचे हे माहिती आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही किती चांगली गोलंदाजी करता यापेक्षा तुम्ही खडतर प्रसंगातून कसे वर येता हे अधिक महत्वाचं आहे. जसप्रीत प्रत्येक फलंदाजाप्रमाणे आपल्या शैलीत बदल करुन विविध प्रकारचे चेंडू टाकतो, यामध्ये तो माहिर झाला आहे.” कुंबळे CricketNext संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ज्या पद्धतीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जसप्रीत चांगली कामगिरी करतोय ते पाहता, त्याच्यात भारताचा सर्वोत्तम जलदगती गोलंदाज होण्याची क्षमता आहे हे मी म्हणू शकतो. वयाच्या २५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतकी प्रगती करणं ही खरचं आश्वासक गोष्ट आहे, कुंबळेने बुमराहच्या खेळीचं कौतुक केलं. विंडीज दौऱ्यानंतर आफ्रिका दौऱ्यासाठी टी-२० संघात बुमराहला संधी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे कसोटी मालिकेत बुमराह पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.